भाजपा आमदाराने पाकिस्तानी एजंट म्हटलं, 102 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाने बनवला CV
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 10:22 AM2020-03-09T10:22:18+5:302020-03-09T10:23:23+5:30
भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी कर्नाटक विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
बंगळुरू - भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने 102 वर्षीय स्वातंत्र्य सैनिक असलेल्या एच.एस. डोरस्वामी यांना पाकिस्तानी एजंट म्हटले होते. भाजपाआमदाराच्या या आरोपानंतर स्वातंत्र्य सैनिक असलेल्या डोरस्वामी यांच्या मनाला मोठी ठेस पोहोचली आहे. त्यामुळेच, वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी आपला सीव्ही (बायोडेटा) लिहायला सुरुवात केली आहे. तुम्ही माझ्याकडील ही कागदपत्रे पाहून ठरवू शकता की, यामध्ये काही देशविरोधी आहे का? असा केविलवाणा सवाल त्यांनी आपला सीव्ही दाखवत केला आहे.
भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी कर्नाटक विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन विधानसभेत मोठा गोंधळही झाला होता. यत्नाल यांनी स्वातंत्र्य सैनिक असलेल्या एच.एस. डोरस्वामी यांना 'पाकिस्तानी एजंट' म्हटले होते. त्यानंतर, वयोवृद्ध डोरस्वामी यांनी आपला सीव्ही लिहायला सुरुवात केली आहे. दक्षिण बंगळुरू येथील आपल्या घरीच त्यांनी कागदांवर काही लिहिलं आहे. सन 1918 मधील आपल्या जन्मापासून ते विनोबा भावेंचं भूदान आंदोलन, बंगळुरूमध्ये तलावांचे पुनरुज्जीवनचे आंदोलन याबाबत त्यांनी लिहिलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकमधील आंदोलनात डोरस्वामी यांचा सहभाग राहिला आहे. मात्र, अचाकन त्यांच्या सामाजिक जीवनावर राजकीय आरोपांची चिखलफेक झाली. बिजापूरचे भाजपा आमदार बसनगौडा पाटील यांनी डोरस्वामी यांना नकली स्वातंत्र्य सैनिक आणि पाकिस्तान एजंट म्हटले होते. विशेष म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य सैनिक असाल तर, स्वातंत्र्य लढ्यातील पुरावा द्या, अशी मागणीही पाटील यांनी केली होती.
पाटील यांच्या या आरोपानंतर काँग्रेसने 1971 सालची काही दस्तावेज सादर केली. बंगळुरू मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे हे दस्तावेज होते. त्यामध्ये, 25 वर्षीय अविवाहीत डोरस्वामी यांना 18 डिसेंबर 1942 पासून 8 डिसेंबर 1943 पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली. तर, भाजपा आणि आरएसएस यांच्या व आमच्या विचारधारेत फरक आहे. पण, भाजपा नेते माझ्यावर एवढ्या खालपर्यंत आरोप करतील,असे मला कधीही वाटलं नव्हत, असे डोरस्वामी यांनी म्हटलंय.
दरम्यान, डोरस्वामी यांचं कनेक्शन अमुल्या नोरोन्हासोबत असल्याचाही आरोप भाजपाने केला होता. एमआयएमच्या सभेत अमुल्याने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे, ती चर्चेत आली होती.