भाजपा आमदाराच्या जीवाला आपल्याच पक्षाच्या नेत्याकडून धोका; अमित शाह, मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 10:46 AM2024-07-20T10:46:08+5:302024-07-20T10:47:50+5:30
आमदार फतेह बहादूर सिंह यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर कॅम्पियरगंजचे आमदार फतेह बहादूर सिंह यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
राजीव रंजन चौधरी नावाच्या व्यक्तीने आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आमदाराने केला आहे. मात्र, राजीव रंजन यांनी पुढे येऊन या आरोपांवर मोठा खुलासा केला. राजीव रंजन चौधरी यांनी आपण भाजपाचा कार्यकर्ता असल्याचं सांगून आमदारावरच गंभीर आरोप केले.
राजीव रंजन म्हणाले, मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि माझी आई जिल्हा पंचायत सदस्य आहे. आमदार फतेहबहादूर यांना खोटे गुन्हे दाखल करून मला व माझ्या कुटुंबीयांना तुरुंगात पाठवायचं आहे. त्यांनी याआधीही लोकांशी असे प्रकार केले आहेत. आमदाराला आपल्याला मारायचे आहे आणि ते स्वतः सपाशी संगनमत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. चौधरी यांनी सीएम योगींकडे सुरक्षेसाठी मदत मागितली आहे.
जिल्हा पंचायत सदस्य आणि राजीव रंजन यांच्या आई सरोज देवी म्हणाल्या, "आमदार त्यांच्या कुटुंबाला सतत धमकावत आहे. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माझ्या कुटुंबाचे रक्षण करण्याची विनंती करते, कारण मला आमदारांकडून धमक्या येत आहेत."
एसएसपी डॉ.गौरव ग्रोवर यांनी आमदाराच्या आरोपांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं, आमदार आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप करत आहेत, त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. आमदाराने आरोप केलेल्या व्यक्तीची आई भाजपाच्या जिल्हा पंचायत सदस्या आहे.
तक्रारीनंतर काही लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. एसएसपीच्या म्हणण्यानुसार, आमदाराला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा आहे, ज्या अंतर्गत सध्या त्यांच्या सुरक्षेसाठी एकूण ११ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.