बुलडोझर घेऊन कारवाईसाठी आलात, आग लावून टाकेन! भाजप आमदार तहसीलदारावर भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:10 PM2022-04-28T17:10:55+5:302022-04-28T17:14:43+5:30
भाजप आमदार तहसीलदारावर भडकल्या; कार्यकर्त्यांसमोर सुनावलं
लखनौ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारी जमिनीवर अवैध कब्जा करणाऱ्यांविरोधात कारवाई करत आहेत. योगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये भूमाफियांविरोधातील कारवाई तीव्र झाली आहे. माफिया आणि नेत्यांच्या मालमत्तांवर बुलडोझरच्या माध्यमातून तोडक कारवाई सुरू आहे. एककीडे योगींनी कारवाईच्या सूचना दिल्या असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या आमदार केतकी सिंह यांनी कारवाईला विरोध केला आहे. बुलडोझर घेऊन कारवाईसाठी आलेल्या तहसीलदारावर सिंह संतापल्या. त्यांनी चारचौघात तहसीलदारांचा अपमान केला.
न्यायालयाच्या आदेशनुसार तहसीलदारांनी एका घरावर कारवाई केली. घराचा काही भाग पाडला. याची माहिती मिळताच आमदार केतकी सिंह कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. कारवाईसाठी आलेल्या तहसीलदारांचा त्यांनी अपमान केला. पूर्ण घर पाडलं असतं, तर संपूर्ण तहसीलात आग लावली असती, अशी धमकीच सिंह यांनी दिली.
आमदार केतकी सिंह यांचा दीड मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली. पण तुम्ही तिचाही सन्मान राखला नाहीत, असं सिंह म्हणाल्या. त्यावर पूर्ण सन्मान राखल्याचं तहसीलदारांनी म्हटलं. बुलडोझर घेऊन आलात हा सन्मान आहे का, असा सवाल सिंह यांनी विचारला. हा जर सन्मान असेल, तर माझी माणसंदेखील तुम्हाला हाच सन्मान परत करतील. तुमच्याकडे बुलडोझर आहे, तर आमच्याकडेही संतांची ताकद आहे, अशा शब्दांत सिंह यांनी तहसीलदारांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.