भाजपा आमदाराची पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:58 AM2018-06-10T03:58:57+5:302018-06-10T03:58:57+5:30
भाजपाच्या एका आमदाराने पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस शिपायाला मारहाण केल्याच्या वृत्तामुळे पक्षात खळबळ उडाली असून, त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे.
भोपाळ : भाजपाच्या एका आमदाराने पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस शिपायाला मारहाण केल्याच्या वृत्तामुळे पक्षात खळबळ उडाली असून, त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे.
देवास जिल्ह्यातील बागली मतदारसंघाचे आमदार चंपालाला देवडा यांच्या तसेच त्यांच्या समर्थकांच्या विरोधात पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाºयास मारहाण करणे या व अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
चंपालाल देवडा यांचा मुलगा पोलीस ठाण्यात गेला होता. तिथे त्याने एका व्यक्तीच्या हातातील पाण्याची बाटली खेचून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलीस शिपायाने त्याला तसे करू नये, असे सांगून, त्याला अडवले. आ. चंपालाल देवडा त्यानंतर काही वेळाने आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी सरळ त्या पोलीस शिपायाच्या कानफटात दोनदा मारले. त्या वेळी मान खाली घालून तो पोलीस शिपाई शांतपणे उभा होता.
या मारहाणीचे सीसीटीव्हीमध्ये चित्रण झाले आहे. त्यामुळे आपण मारहाण केली नाही, असे सांगण्याची आ. चंपालाल देवडा यांना संधीच नाही, असे उदयनगर पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्याचे प्रमुख शिव रघुवंशी यांनी आ. देवडा व त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे मान्य केले. (वृत्तसंस्था)