गोरक्षकांनी मारहाण केलेल्या दलितांनी केला हिंदू धर्माचा त्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 08:45 AM2018-04-30T08:45:43+5:302018-04-30T08:46:10+5:30
गेल्यावर्षी मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती.
अहमदाबाद: गुजरातच्या उना येथे जून 2016 मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आलेले दलित तरूण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्माचा त्याग केला आहे. उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी रविवारी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. या सोहळ्यात भिक्खुंकरवी 400 दलितांना बौद्ध धर्माची शपथ देण्यात आली. गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यातंर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर या दलित कुटुंबीयांच्या धर्मांतराला अधिकृत मान्यता मिळेल.
गेल्यावर्षी मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती. गोरक्षकांच्या टोळक्याने त्यांची धिंड काढली होती, तसेच त्यांना एका कारला बांधून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावरून केंद्रातील मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काल या तरूणांनी अन्य काही दलित बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला.
तत्पूर्वी 25 एप्रिलला रमेश सरवय्या आणि अशोक सरवय्या यांच्यावर गोरक्षकांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला होता. 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेले हे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. यावेळी आरोपींकडून रमेश व अशोक यांना त्यांच्याविरुद्धचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली. मात्र, त्याला नकार दिल्यानंतर आरोपी किरणसिंह दरबार व त्याच्या साथीदारांनी या दोघांवर हल्ला केला होता. मात्र, याठिकाणी लोक जमल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढावा लागला.
दरम्यान बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर पीडित तरूणांचे वडील बाळू सरवय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आज मला मुक्त आणि सामर्थ्यशाली वाटत आहे. मी अंध रूढींना मुठमाती दिली आहे. ही भावनाच किती मुक्ततेची जाणीव करून देणारी आहे. मला मारहाण झाल्यानंतर माझ्यावर काही गोष्टींचे ओझे आहे, असे मला वाटत होते. मात्र, आता मी हे सर्व ओझे भिरकावून दिले आहे. यापुढे आम्हाला हवे ते करण्यापासून कोणताही देव किंवा देवता रोखू शकणार नाही. आम्ही शिक्षण घेऊ, स्वत:ला सुशिक्षित करू आणि योग्य तो व्यवसाय निवडू, असे बाळू सरवय्या यांनी सांगितले.