धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:01 PM2022-06-08T17:01:31+5:302022-06-08T17:02:32+5:30

भाजपा प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

BJP MLA Raja Singh charged with hurting religious sentiments | धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल

Next

हैदराबाद - भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपा चांगलीच अडचणीत आली आहे. जगातील इस्लामिक देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यातच आता भाजपा आमदारानं धार्मिक भावना दुखावल्यामुळे मंगळवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा आमदार टी राजा यांच्यावर एका समुदायाबद्दल चिथावणीखोर विधान केल्याचा आरोप आहे. 

पोलिसांच्या तक्रारीनुसार, एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तक्रार नोंदवली आहे. त्यात भाजपा आमदार एका धार्मिक स्थळाविरोधात अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधानं करत आहेत. त्यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यानुसार भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर कलम २९५ ए अंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यावर कारवाई
भाजपा प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. नुपूर शर्मांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, या वादापासून स्वत:ला बाजूला करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी नुपूर शर्मांविरोधात कारवाई करताना त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केलं आहे. तसेच भाजपाने मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदल यांनाही निलंबित केलं आहे.

धार्मिक मुद्द्यांवर प्रवक्त्यांसाठी भाजपच्या मार्गदर्शक सूचना 
भाजपाने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्ष प्रवक्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात विशेषत: धार्मिक भावना दुखावू नयेत, असे निर्देश दिले आहेत. भाजपच्या एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानुसार सर्व नेते आणि प्रवक्त्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय प्रसार माध्यम विभागाच्या परवानगीशिवाय निवेदन जारी करु नये. कोणता प्रवक्ता,कोणत्या टीव्ही चॅनलवर पक्षाची बाजू मांडेल, हे भाजपची माध्यम समिती ठरविते. यासाठी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. 

भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर इस्लामिक देशांनी भारताविरुद्ध राजकीय स्तरावर विरोध व्यक्त केला. तसेच भारतीय उत्पादनावर बहिष्काराचे आवाहनही केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Web Title: BJP MLA Raja Singh charged with hurting religious sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा