आमदाराला बलात्कारप्रकरणी २५ वर्षांची शिक्षा; पीडित बहिणीसाठी भाऊ ९ वर्षे लढला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 09:46 AM2023-12-16T09:46:28+5:302023-12-16T09:48:06+5:30
धमक्यांना न घाबरता लढा देत राहिला
राजेंद्र कुमार
लखनौ : भाजपचे आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून २५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गोंड यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सोनभद्र जिल्ह्याचे विशेष न्यायाधीश एहसानुल्लाह खान यांनी ही शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर पीडित बहिणीच्या भावाने ९ वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. रामदुलार हे गेल्या पाच वर्षांत बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेले दुसरे भाजप आमदार आहेत.
शिक्षेनंतर मान झुकली...
खचाखच भरलेल्या कोर्टात आमदार गोंड यांना शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा त्यांची मान खाली झुकली होती आणि ते दु:खी झाले होते. दुसरीकडे, प्रदीर्घ संघर्ष आणि चढ-उतारानंतर अखेर न्याय मिळाल्याचे सांगत पीडितेच्या भावाने न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले.
आमदारकी जाणार : याबाबत अल्पवयीन मुलीच्या भावाने रामदुलार यांच्याविरुद्ध म्योरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाची सुनावणी तब्बल ९ वर्षे न्यायालयात सुरू होती. शुक्रवारी न्यायालयाने बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावताना आमदार रामदुलार गोंड यांना तत्काळ तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्यांना आमदारकी गमवावी लागणार आहे.
अखेर आज माझ्या बहिणीला न्याय मिळाला...
आमदार रामदुलार यांच्याविरोधात फिर्याद देणाऱ्या पीडित मुलीवर खटला मागे घेण्यासाठी खूप दबाव होता. मात्र, त्यांनी दबाव झुगारला. पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराच्या घटनेनंतर भाजपचे आमदार रामदुलार गोंड यांनी त्यांना विविध प्रकारची प्रलोभने आणि धमक्या दिल्या होत्या. मात्र, आमदाराच्या धमक्यांना तो घाबरला नाही आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात लढा देत राहिला. आम्ही या निर्णयाचा आदर करतो. आज माझ्या बहिणीला न्याय मिळाला आहे, असे तो म्हणाला.