जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 08:28 PM2020-02-10T20:28:56+5:302020-02-10T20:29:56+5:30
मी कागद दाखवणार नाही, छाती दाखवून गोळी मारायला सांगणार असं विधान औवेसी यांनी केलं होतं.
मेरठ - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशात आंदोलन पेटलं असताना एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केलेल्या विधानावर भाजपा नेत्याने टोला लगावला आहे. औवेसी यांना उत्तर देताना भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी वादग्रस्त विधान केले आहे. औवेसी कागद दाखवतील अन् जोडेही खातील अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेरठच्या सरधना मतदारसंघाचे ते आमदार आहेत.
औवेसी यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संगीत सोम म्हणाले की, मी कागद दाखवणार नाही, छाती दाखवून गोळी मारायला सांगणार असं औवेसी म्हणतात पण त्याचा फायदा नाही. जर तुम्हाला या देशात राहायचं असेल तर सरकार सांगेल तो कागद दाखवावा लागेल. जर औवेसी म्हणतात छातीवर गोळी खाण्यासाठी छाती कमी पडेल. तर त्यांना सांगतो, तुम्ही जोडेपण खाल अन् कागदपण दाखवाल असा इशारा त्यांनी दिला.
औवेसी कुरनूलमध्ये काय बोलले?
औवेसी यांनी रविवारी आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे आयोजित सभेत बोलताना सांगितले होते की, "मी देशात राहणार आहे, मी कागद दाखवणार नाही." जर कागद दाखविण्यास सांगितले तर छाती दाखवू अन् सांगू मार गोळी. माझ्या ह्दयावर गोळी घाला कारण त्या अंत: करणात भारताबद्दल प्रेम आहे, जे सरकारला समजू शकत नाही असं ते म्हणाले.
बुरखा बंदी विधानावर पाठिंबा
यूपीचे राज्यमंत्री रघुराज सिंह यांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आलेल्या आणखी एका वादग्रस्त विधानास संगीत सोम यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले, 'बर्याच काळापासून बुरखा हा मुस्लिम स्त्रियांना त्रासदायक आहे. बुरखा म्हणजे महिलांवर बंदी. सर्व अयोग्य गोष्टी त्या वेशात घडत आहेत. बुरखा हा दहशतवादाचा पर्याय बनला आहे, बुरखा 100% बंद असणे आवश्यक आहे असं ते म्हणाले.
रघुराज सिंह म्हणाले होते, 'बँकांमध्ये असे लिहिले आहे की बुरखा बंदी आहे. जर आपण बुरखा घालून गेलात तर सीसीटीव्हीवर येऊ शकणार नाही, आपला चेहरा लपला जाईल. आपली ओळख कळू शकणार नाही. शाहीन बागेत लोकांनी बुरखा घातला आहे. बुरखा म्हणजे चोरांना लपवण्याचे साधन आहे. दहशतवाद्यांकडून हे कवच मिळते. त्यामुळे बुरखा बंदी घालण्यात यावी असं त्यांनी सांगितले.