'ताजमहालचं नाव बदलून राममहाल करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 03:20 PM2018-06-11T15:20:44+5:302018-06-11T15:20:44+5:30
भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचं विधान
लखनऊ: वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता ताजमहालचं नाव बदलण्यात यावं, असं वक्तव्य केलं आहे. ताजमहालाचं नाव बदलून राममहाल किंवा कृष्णमहाल केलं जावं, असं उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या सिंह यांनी म्हटलं.
'जर कोणी भारतातील संसाधनांचा, इथल्या मातीचा वापर करुन स्मारक उभारलं असेल, तर ते देशाचं आहे. त्या स्मारकाला कोणी स्वत:च नाव देत असेल, तर ते चांगलं नाही,' असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं. यावेळी त्यांना ताजमहालचं नाव बदलण्यात यावं का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, ताजमहालचं नाव बदलून ते राममहाल किंवा कृष्णमहाल करायला हवं. माझ्या हातात असतं तर मी ताजमहालचं नाव बदलून राष्ट्रभक्त महाल केलं असतं,' असं सिंह म्हणाले.
सुरेंद्र सिंह त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्रय करणाऱ्या महिला जास्त चारित्र्यवान असतात, असं विधान काही दिवसांपूर्वीच सिंह यांनी केलं होतं. 'वेश्या पैसे घेऊन किमान काम तरी करतात, त्यांना पैसे दिल्यावर त्या स्टेजवर नाचतात. मात्र अधिकारी पैसे घेऊनही करतील, याची खात्री देता येत नाही', असं सिंह यांनी म्हटलं होतं. 'घूस मांगे तो घूसा दो, नहीं माने तो जूता दो', अशी घोषणाही त्यांनी दिली होती.