'मतांची भीक मागणारे देतात इफ्तार पार्टी'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 06:50 PM2018-06-11T18:50:16+5:302018-06-11T18:50:16+5:30
गोशमहलमधल्या भाजपा आमदारानं इफ्तार पार्टीवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह लोध यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.
हैदराबाद- गोशमहलमधल्या भाजपा आमदारानं इफ्तार पार्टीवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह लोध यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. टी राजा म्हणाले, मी असं कोणत्याही इफ्तार पार्टीचं आयोजन करणार नाही. तसेच अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी हा मेसेज पाठवला आहे. रमझानच्या महिन्यात इतर नेते करतात, त्याप्रमाणेच माझ्या मित्रानं मला इफ्तार पार्टीचं आयोजन करण्याचा सल्ला दिला होता. तेलंगणाचे अनेक आमदार डोक्यावर टोपी घालून सेल्फी घेत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात मश्गुल आहेत. इफ्तार पार्टीमध्ये जे नेते जातात ते मतांसाठी भिकारी असतात. माझा विचार वेगळा आहे. हिंदू धर्मानं सर्वांचा आदर करण्याची शिक्षा दिली आहे. परंतु काही धर्म आणि त्यांची धार्मिक पुस्तके हिंदूंना मारण्याचं शिक्षण देत आहेत.
जे हिंदूंना मारण्याची गोष्ट करतात, त्यांना मी कशी इफ्तार पार्टी देऊ. अशा इफ्तार पार्टीमध्ये मी कसा जाऊ शकतो. टी राजा सिंह यांनी ग्रीन बुकमध्ये याचा उल्लेख असल्याचंही अधोरेखित केलं आहे. हे ग्रीन बुकच भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे त्याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. त्यावर बंदी येण्यासाठी मी संघर्ष करत राहीन. मला अखंड हिंदू राष्ट्र, अयोध्येत राम मंदिर निर्माण, पूर्ण देशात गोहत्याबंदी, काश्मिरी पंडितांची पुनर्वापसीची स्वप्नं पडतात. जगभरात 50 मुस्लिम देश आणि 100 ख्रिश्चनांचे देश आहेत. मग हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही, असा सवालही त्या आमदारानं उपस्थित केला आहे.