#MeToo: यशस्वी होण्यासाठी महिला शॉर्टकट वापरतात- भाजपा आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:00 AM2018-10-15T09:00:07+5:302018-10-15T09:08:09+5:30
भाजपाच्या महिला आमदाराचं वादग्रस्त विधान
नवी दिल्ली: सध्या देशभरात मी टू चळवळीनं जोर धरला आहे. अभिनेत्री, पत्रकार त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला #MeToo मोहिमेच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. मात्र यावरुन भाजपाच्या महिला आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे. महिला त्यांच्या प्रगतीसाठी शॉर्टकट वापरतात, असं धक्कादायक विधान मध्य प्रदेशातील भाजपा आमदार उषा ठाकूर यांनी केलं आहे. महिला त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नैतिक मूल्यांशी तडजोड करतात. त्यामुळे त्या अडचणीत सापडतात. नैतिक मूल्यांशी तडजोड करुन यशस्वी होण्याला अर्थ नसतो, असं विधान ठाकूर यांनी केलं. त्यामुळे त्या वादात सापडल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर #MeToo चळवळ जोरात सुरू आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांनी अभिनेते, दिग्दर्शक, पत्रकार, राजकीय नेत्यांवर आरोप केले आहेत. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेल्या एम. जे. अकबर यांच्यावरदेखील अनेक महिला पत्रकारांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र राज्यमंत्री असलेले अकबर अडचणीत सापडले आहेत. याचबद्दल भाजपा आमदार उषा ठाकूर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना महिला यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट वापरतात, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं.
एम. जे. अकबर पत्रकारितेत वरिष्ठ पदांवर असताना त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी केल्या आहेत. मात्र हे सर्व आरोप अकबर यांनी फेटाळले आहेत. 'माझ्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी प्रतिमा डागाळण्याच्या हेतूनं हे आरोप करण्यात आले आहेत,' असं अकबर यांनी म्हटलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच #MeToo वादळ कसं काय उठलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं यावरुन अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.