हिंदूंनो, कायदा होत नाही तोवर सूट आहे, थांबू नका; मुलं जन्माला घालण्याबाबत भाजप आमदाराची मुक्ताफळं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 09:06 AM2018-02-24T09:06:26+5:302018-02-24T09:06:26+5:30
हिंदूंनो मुलं जन्माला घालत राहा, थांबू नका, असं वादग्रस्त विधान भाजपाच्या आमदारानं केले आहे.
मुझफ्फरनगर : वादग्रस्त विधाने करुन नेहमी चर्चेत राहणारे मुझफ्फरनगरच्या खतौली येथील भाजपा आमदार विक्रम सैनी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) मुझफ्फनगर येथे शिव चौक परिसरात लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपाचे आमदार विक्रम सैनीदेखील सहभागी झाले होते. मुलं जन्माला घालण्यासंदर्भात विक्रम सैनी यांनी विचित्र तसंच वादग्रस्त विधान केले आहे.
आरोग्य विभागाच्या 'हम दो हमारे दो' या घोषवाक्याबाबत बोलताना भाजपा आमदार विक्रम सैनी यांनी म्हटले की, 'हम दो हमारे दो' हे तर आम्ही ऐकले, मात्र आपल्यातील बहुतेकजण तर एकाच अपत्यावर अडकलेत. यावरच न थांबता त्यांनी पुढे आणखी विचित्र विधान करत म्हटले की, ''हम दो हमारे 18, हम पांच हमारे पच्चीस. कायदा सर्वांसाठी असावा, जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत हिंदू भावांनो तुम्हाला सूट आहे. थांबू नका'', असे वादग्रस्त विधान विक्रम सैनी यांनी केले आहे.
विक्रम सैनी इथवरच थांबले नाहीत, कायदा बनेल तर तो सर्वांसाठी बनेल, असेही वक्तव्य करत त्यांनी खासगी आयुष्याबाबतही माहिती जाहिररित्या येथे मांडली. ''मला दोन अपत्य झाल्यानंतर तिस-या अपत्यास माझ्या पत्नीनं नकार दिला. त्यावेळी आणखी चार-पाच मुलं होणार, असे मी तिला सांगितले'', अशा पद्धतीनं वादग्रस्त वक्तव्य करताना सैनी यांनी आपल्या पत्नीलाही सोडले नाही. या विधानावरुन सैनींना महिलांचा अजिबात सन्मान नसल्याची चौफेर टीका होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाचाळवीर नेते हे भाजपसाठी डोकेदुखी ठरु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार नेपालसिंह यांनीदेखील सैनिकांबाबत वादग्रस्त विधान केले होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैन्याच्या जवानांचा अवमान करणारे विधान भाजपा खासदार नेपालसिंह यांनी केले होते. ‘सैन्याचे जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचा जवान मरत नाही’ असे संतापजनक विधान नेपालसिंह यांनी केले होते. यावरुन नेपालसिंह यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती.
#WATCH Muzaffarnagar: BJP MLA Vikram Saini says, 'jab tak kaanoon nahi banta (on population control) Hindu bhaiyon apko chhoot hai rukna mat.' (23.02.2018) pic.twitter.com/b3TqjNHh3M
— ANI UP (@ANINewsUP) February 24, 2018