भाजपा आमदाराच्या पजेरो कारने दुचाकीला उडविले; तिघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 02:18 PM2019-10-08T14:18:40+5:302019-10-08T14:19:30+5:30
मृतांच्या नातेवाईकांनी आमदारच गाडी चालवत असल्याचा आरोप केला आहे.
बलदेवगड : खरगपूरचे भाजपाआमदार राहुल सिंह लोधी यांच्या पजेरो गाडीने बलदेवगड मार्गावरील पपावनी गावाजवळ मोटारसायकल स्वारांना उडविले. यामध्ये दोघेजण जागीच ठार तर तिसरा झाशीला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. याविरोधात संतप्त जमावाने टीकमगढ-बलदेवगढ रस्ता चार तासांसाठी रोखून धरला होता.
राहुल सिंह लोधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या जमावाने केली होती. मात्र, प्रशासनाने समजाविल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. राहुल सिंह हे माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे भाचे आहेत. पोलिसांनी आमदारावर 304 अ, 279/337 आणि 184 कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.
आमदार राहुल सिंह लोधी यांनी चालक वाहन चालवत होता. आपण वाहनामध्ये नव्हतो, असा दावा केला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांनी आमदारच गाडी चालवत असल्याचा आरोप केला आहे. यावर लोधी यांनी गावातील लोक आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. या घटनेशी माझा संबंध नाही.
बृजेंद्र अहिरवार (28), रवि अहिरवार (27) आणि मदन अहिरवार (19) हे तिघे मोटारसायकलवरून टीकमगढहून बलदेवगढाकडे जात होते. यावेळी आमदाराच्या गाडीने त्यांना मागून धडक दिली. रवीचे काका अच्छेलाल यांनी आरोप केला आहे की आमदार राहुलच कार चालवत होते.
यावर आमदार लोधी यांनी सांगितले की, मी फुटेरमध्ये होतो. कार्यक्रम संपल्यानंतर मी चालक विजय यादवला पजेरो घेऊन यायला सांगितले. चालकाने सांगितले की, घटनास्थळी दोन ऑटो आणि एक बाईक पडलेली होती. तसेच तीन जखमीही पडलेले होते. गर्दीतून वाट काढत चालक रेल्वे मार्ग पार करून फुटेरला पोहोचला आणि घटनेची माहिती दिली.