भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 11:49 AM2024-10-14T11:49:26+5:302024-10-14T11:49:52+5:30
West Bengal News: पश्चिम बंगालमधील भाजपाचे राज्यसभा खासदार अनंत महाराज यांनी आश्रमात घुसून एका साधूला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सीताई परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
पश्चिम बंगालमधीलभाजपाचे राज्यसभा खासदार अनंत महाराज यांनी आश्रमात घुसून एका साधूला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सीताई परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर जाळून या प्रकाराचा निषेध केला आहे. जोपर्यंत अनंत महाराज यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत करण्यात आलेल्या आरोपानुसार अनंत महाराज हे रविवारी संध्याकाळी सीताई येथील रामकृष्ण विवेकानंद सेवा आश्रमात गेले होते. यादरम्यान, अनंत महाराज यांनी धार्मिक चर्चेवरून आश्रमामधील साधू विज्ञानानंद तीर्थ महाराज यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन अनंत महाराज यांनी साधू विज्ञानानंद यांना धक्काबुक्की करून त्यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात येत आहेत. यावेळी अनंत महाराज यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही तिथे होते.
मरहाण केल्यानंतर अनंत महाराज आश्रमामधून निघून गेले. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी सीताई-माथाभांगा मार्ग रोखून आंदोलनास सुरुवात केली. तसेच अनंत महाराज यांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत केले. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता सरकारमधील मंत्री उदयन गुहा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, साधूला मारहाण केल्याचा आरोप झालेले भाजपा खासदार अनंत महाराज यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. मारहाणीची कुठलीही घटना घडलेली नाही. मी आश्रमात जाऊन महाराजांचं नावा, ओळख आणि शैक्षणित पात्रता विचारत होतो. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी काही सांगण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर त्या साधूंनी स्थानिक ग्रामस्थांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. त्यामुळे हे आंदोलन होत आहे, असा प्रत्यारोप अनंत महाराज यांनी केला.