Maharashtra Political Crisis: “ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला कौल दिलाय, आता फक्त कागदोपत्री निर्णय राहिलाय”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:50 AM2022-08-08T11:50:15+5:302022-08-08T11:51:28+5:30
Maharashtra Political Crisis: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर असून, दुसरा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, असे भाजप खासदाराने म्हटले आहे.
नवी दिल्ली: एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत असला, तरी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपसह शिंदे गटाला बहुतांश ठिकाणी मोठा विजय मिळाला आहे. यातच आता जनतेनेचे शिंदे गटाला स्विकारलेले असून, आता केवळ कागदोपत्री निर्णय राहिला असल्याची प्रतिक्रिया भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेला कौल दिलाय. लोकांनी बहुमताने या पॅनलच्या सदस्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, तो कागदोपत्री असेल, असे अनिल बोंडे यांनी सांगितले. शिवसेनेचे शिंदे गटातील लोक भाजपासोबत मैत्री करत आहेत, उद्धव ठाकरे गटानेही भाजपसोबत युती केल्यास तिला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.
भाजप आणि दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे
निवडणूक आयोगाचे अधिकारी काय तो निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनतेने निर्णय करून टाकलाय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एक नंबरवर भाजप राहिला आणि दोन नंबरवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची एकनाथ शिंदेंची शिवसेना राहिली. लोकांनी स्वीकारलेय की हा भाजप आणि दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देईल, तो कार्यालयीन मॅटर आहे. लोकांच्या मनातले लोकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चंगाल्या प्रकारे दाखवून दिले असल्याचे बोंडे म्हणाले.
दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे मोठे नुकसात झाले आहे. विदर्भात गडचिरोली, अमरावती, वर्धेत मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि विदर्भापर्यंत खूप नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी तत्काळ एनडीआरएफची टीमही पाठवली. मात्र यावेळी एनडीआरएफची मदतच मिळून उपयोग नाही तर पायाभूत सुविधांचं नुकसान झालेय. पूल वाहून गेलेत, जमीन खरडून गेलीय. यासाठी मदत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा बोंडे यांनी व्यक्त केली.