Maharashtra Politics: “लव्ह जिहाद प्रकरणी कायदा करायला हवा, संसदेत विधेयक आणणार”; अनिल बोंडे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:33 PM2022-09-15T19:33:55+5:302022-09-15T19:34:31+5:30
लव्ह जिहाद संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती अनिल बोंडे यांनी दिली.
Maharashtra Politics: गेल्या काही काळापासून लव्ह जिहादची प्रकरणे वाढताना दिसत असून, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात देशातील काही राज्य सरकारांनी आपापल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. मात्र, लव्ह जिहाद प्रकरणी देशात लागू होणारा कायदा करायला हवा, यासाठी संसदेत विधेयक मांडणार असल्याची माहिती भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे यांनी दिली.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये बोलताना अनिल बोंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राज्यात सध्या ‘लव जिहाद’ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार आहे. तसेच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
‘लव्ह जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान
‘लव्ह जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांडनंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले, त्याचाही लव्ह जिहाद प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले. मेळघाटातील आदिवासी मुलींना फसवून पळवून आणले जाते. मुलींना विरोध केला तर मुलींना जीवही गमवावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना चिखलदरा तालुक्यातून समोर आली आहे. ही मुले महाविद्यालयासमोर उभे राहुल मुलींवर लक्ष ठेवतात. फेसबुकच्या माध्यामातून मुलींशी संपर्क केला जातो. हे सर्व सुनियोजितपणे सुरू असते, असे अनिल बोंडे यांनी सांगितले.
लव्ह जिहाद प्रकरणी कायदा करायला हवा
लव्ह जिहाद संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच येत्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहे. याबरोबरच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या पालकांना एक महिना आधी सूचना दिली जावी, असे मत खासदार अनिल बोंडे यांनी मांडले.