भाजपा खासदारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज
By admin | Published: May 4, 2016 02:09 AM2016-05-04T02:09:12+5:302016-05-04T02:09:12+5:30
सरकारच्या प्रमुख योजनांची सफलता जनतेपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा खासदारांबद्दलची नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी संसदीय पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत बोलून दाखविली.
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
सरकारच्या प्रमुख योजनांची सफलता जनतेपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा खासदारांबद्दलची नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी संसदीय पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत बोलून दाखविली.
जनतेकडे जा, व्यापक प्रचार मोहीम राबवा, असा संदेशही त्यांनी दिला. दोन महिन्यांपूर्वी मी खासदारांना मतदारसंघात ऊर्जा महोत्सव साजरा करण्याचा सल्ला दिला होता. किती जणांनी तो साजरा केला? या त्यांच्या प्रश्नावर मिळालेला अल्प प्रतिसाद मोदींच्या नाराजीचे कारण ठरला.
मोदींना उद्विग्नता लपवून ठेवता आली नाही. मुद्रा योजनेसह एलपीजी कनेक्शनची व्याप्ती आणि गावांच्या वाढत्या विद्युतीकरणाच्या यशाची माहिती खासदारांनी जनतेपर्यंत पोहोचविली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला पक्षाध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. मुद्रा बँकेचा लाभ तीन कोटींपेक्षा जास्त लोकांनी घेतला. मोफत एलपीजीचा लाभही तेवढ्याच संख्येने दिला. हजारो गावांत वीज पोहोचली असून, एकही गाव विजेविना राहणार नसल्याचे सांगण्यास आपण ऊर्जा महोत्सव साजरा करायलाच हवा, असे मोदींनी स्पष्ट केले.