राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा इशारा; ठेवली अशी अट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 03:58 PM2022-05-05T15:58:27+5:302022-05-05T16:00:09+5:30
राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी घोषणा केली आहे. मात्र याच वेळी, राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
याच बरोबर, राज ठाकरे जोवर माफी मागत नाहीत, तोवर त्यांची भेट घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. तसेच, राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही, असेही खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी एका पाठोपाठ एक ट्विट करत राज ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच, उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप करत, यासाठी राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे. ट्विट करत ते म्हणाले, "उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी."
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सल्ला देत बृजभूषण शरण सिंह यांनी ट्विट केले की, ''जोवर राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये, अशी आपली विनंती आहे." एवढेच नाही, तर ''राम मंदिर आंदोलनापासून ते मंदिर उभारण्यापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद आणि सर्वसामान्यांचीच महत्वाची भूमिका आहे. ठाकरे कुटुंबाचा याच्याशी कसलाही संबंध नाही,'' असेही बृजभूषण यांनी म्हटले आहे.