Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: “राज ठाकरेंचे स्वागतच करु, अयोध्या दौऱ्याला विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांना उपरती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:33 AM2023-04-10T11:33:56+5:302023-04-10T11:34:50+5:30
Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या दौऱ्यावर जात रामलल्लाचे दर्शन घेतले. शिंदे गटासह भाजपचे नेते, मंत्री अयोध्येला गेले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना आता उपरती झाल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध नसून, त्यांचे स्वागतच करू, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंनी केलेल्या विधानांबद्दल जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी घोषणाच बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यामुळे तणवपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आता बृजभूषण सिंह यांनी आपले राज ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नव्हते, त्यांनी एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच केला आहे, असे म्हटले आहे.
मला कोणताही आक्षेप नाही, कुणालाच कोणता आक्षेप नाही
अयोध्या दौरा रद्द करून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा सन्मान केला. राज ठाकरेंशी माझे काही वैयक्तिक भांडण नाही. त्या वेळी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर म्हटले होते की, त्यांनी माफी मागावी आणि मग इकडे यावे. पण त्यांनी इथे न येऊन एक प्रकारे आमचा सन्मान केला आहे. त्यामुळे मोठा वाद टळला. आता मला वाटते की ते जर आले तर मला कोणताही आक्षेप नाही. कुणालाच कोणता आक्षेप नाही, असे बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले.
अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे
राज ठाकरे यांनी तेव्हा वाद टाळून उत्तर भारतीयांचा एक प्रकारे सन्मानच केला. ते जरी स्वत:च्या तोंडून खेद व्यक्त करू शकले नाहीत किंवा दिलगिरी व्यक्त करू शकले नाहीत तरी न येणे हा एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच आहे. राज ठाकरेंच्या बाबतीत मला आता काहीही म्हणायचे नाही. जशी अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे. त्यांनी इकडे यावे, त्यांचे स्वागतच आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गतवर्षी ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. मनसेकडून तसे जाहीर करण्यात आले होते. मात्र, बृजभूषण सिंह यांनी अयोध्येत राज ठाकरेंना प्रवेश करू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत थेट आव्हानच दिले होते. यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले होते. तसेच हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंनी अयोध्या दौरा पुढे ढकलला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"