भाजपा खासदारानं फ्लॅटवर बोलावून केला बलात्कार, "त्या" महिलेचा गंभीर आरोप
By admin | Published: May 1, 2017 06:25 PM2017-05-01T18:25:23+5:302017-05-01T18:25:23+5:30
भाजपा खासदार के. सी. पटेल यांनी दिल्ली पोलिसांत एका महिलेनं त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भाजपा खासदार के. सी. पटेल यांनी दिल्ली पोलिसांत एका महिलेनं त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दिली आहे. त्या महिलेनं माझ्याकडून 5 कोटींची मागणी केल्याचीही खळबळजनक माहिती या खासदारानं दिली होती. मात्र आता तक्रार करण्यात आलेल्या महिलेनंच भाजपा खासदार के. सी. पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेनं मीडियासमोर येत खासदार के. सी. पटेल यांच्या आरोपांचं खंडन केलं आहे. तसेच मला धमकावून माझ्यावर बलात्कार करण्यात आल्याचाही आरोप त्या महिलेनं के. सी. पटेल यांच्यावर केला आहे, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.
पेशानं वकील असलेल्या महिलेनं सांगितलं की, खासदार के. सी. पटेल यांचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू होता. त्याच दरम्यान माझी के. सी. पटेल यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी खटल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मला स्वतःच्या नर्मदा अपार्टमेंट, 604 नंबरच्या फ्लॅटवर बोलावलं. त्यावेळी त्यांनी माझ्यावर बलात्कारही केला आणि तोंड उघडल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा गौप्यस्फोट या महिलेनं केला आहे. महिला म्हणाली, के. सी. पटेल डिनरच्या निमित्तानं गाझियाबादमधील माझ्या घरीसुद्धा आले होते. त्यावेळीही त्यांनी माझ्यासोबत जोरजबरदस्तीनं बलात्कार केला.
28 मार्चला महिलेनं स्वतःच्या बचावाखातर खासदाराचा एक सेक्स व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्या महिलेनं तू माझं भरपूर शोषण केलं आहेस. आता मी तुझी पोलिसांत तक्रार करणार असल्याची धमकीही खासदाराला दिली होती. खासदार के. सी. पटेल यांच्याविरोधात 15 एप्रिलला मी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी खासदाराविरोधात गुन्हा दाखल केला नाही. तसेच खटला मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आल्याचंही महिलेनं सांगितलं आहे. पोलीस मीच गुन्हेगार असल्यासारखे माझी चौकशी करत असल्याचंही ती महिला म्हणाली. खासदाराच्या आरोपांचं खंडन करत तिने सांगितलं की, माझी कोणतीही गँग नाही आणि मी पैशासाठी के. सी. पटेल यांना फोन केला नव्हता. मी भाजपाची कार्यकर्ती नसतानाही के. सी. पटेल मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहा यांची भेट घडवून देणार असल्याचे म्हणाले होते. विशेष म्हणजे महिलेनं 6 ते 7 महिन्यांपूर्वी एका राज्यसभा खासदारानंही एडिश्नल अॅडव्होकेट बनवण्याच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप केला आहे. मात्र काही लोकांच्या मध्यस्थीनंतर मी तक्रार परत घेतली आहे. त्या महिलेनं मेरठ युनिव्हर्सिटीतून लॉची डिग्री मिळवली आहे.