भाजपा खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अन्य महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:39 AM2018-08-26T05:39:35+5:302018-08-26T05:40:28+5:30
भाजपाचे राज्यसभा सदस्य व प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहा राव यांच्या कारने आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात दोन महिलांना धडक दिली
गुंटूर : भाजपाचे राज्यसभा सदस्य व प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहा राव यांच्या कारने आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात दोन महिलांना धडक दिली. त्यापैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर संतप्त स्थानिक लोक रस्त्यावर जमताच, खा. नरसिंहा राव तेथून घाईघाईने निघून गेले.
कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अपघात झाला, तेव्हा आपण झोपलो होतो, असे खा. राव म्हणाले. मात्र अपघातानंतर ते निघून गेल्याने सोशल मीडियातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अपघात होताच, दोघा महिलांचे कुटुंबीय व गावकरी रस्त्यावर आले. हा संतप्त जमाव पाहून खा. राव अन्य कारमधून निघून गेले. ते म्हणाले की, अपघात झाला, तेव्हा मी मागच्या सीटवर झोपलो होतो. पोलीस येईपर्यंत व महिलांना रुग्णालयात नेईपर्यंत मी थांबलो होतो. आपण निघून गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे. दोन्ही कुटुंबांची आपण लवकरच भेट घेणार आहोत. (वृत्तसंस्था)
विमान प्रवासावर निर्बंध
या अपघातानंतर खा. राव लगेच निघून गेल्याबद्दल गावकरी तर संतापले आहेतच, पण सोशल मीडियातूनही त्यांच्यावर सतत टीका होत आहे. जखमींना मदत करण्याऐवजी खासदार महोदयांनी निघून जाण्याचा प्रकार निंदनीय व दुर्दैवी आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत.