भाजपा खासदाराने घरात घुसून मारहाण केली, तहसीलदारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 09:18 PM2020-04-07T21:18:15+5:302020-04-07T21:19:38+5:30
संबंधित खासदारांनी धान्य वितरण करण्यासाठी यादी पाठवली होती. या यादीनुसार धान्याचे वितरण होत नसल्याची त्यांची तक्रार होती.
लखनौ - भाजपाच्या खासदाराने आपल्याला घरात घुसून मारहाण केली असा आरोप एका तहसीलदाराने केला आहे. कनौजचे तहसीलदार अरविंद कुमार यांनी भाजपाचे स्थानिक खासदार सुब्रत पथक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घरात घुसून मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर समाजवादी पक्षाने सुब्रत पाठक यांच्या कृत्याचा निषेध केला. तसेच योगी आदित्यनाथ यांनी पाठक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
यायाबत तहसीलदार अरविंद कुमार यांनी सांगितले की, खासदार सुब्रत पाठक यांनी धान्य वितरण करण्यासाठी यादी पाठवली होती. या यादीनुसार धान्याचे वितरण होत नसल्याची त्यांची तक्रार होती.
दरम्यान, पाठक यांनी मला फोन करून शिवीगाळ केली. तसेच कार्यालयात येऊन मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर मी या प्रकाराची तक्रार डीएम यांच्याकडे केली. नंतर मी घरी गेलो. तर संबंधित खासदार 20-25 कार्यकर्त्यांसह माझ्या घरी आले. तिथे त्यांनी मला मारहाण केली, असा आरोप तहसीलदार अरविंद कुमार यांनी केला.
दरम्यान, या घटनेनंतर समाजवादी पार्टीने भाजपा खासदार सुब्रत पाठक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कानपुरनंतर कनौज येथे भाजपा खासदाराने घरी धान्याची पाकिटे न पाठवल्याने तहसीलदाराला घरात घुसून केलेली मारहाण निंदनीय आहे. आता योगी आदित्यनाथ यांनी दिलेला शब्द पाळून खासदार सुब्रत पाठक यांच्यावर एनएसए लावून कारवाई करावी, अशी मागणी केली.