राम मंदिर उभारणीसाठी गौतम गंभीरकडून १ कोटींची मदत!
By स्वदेश घाणेकर | Published: January 21, 2021 05:18 PM2021-01-21T17:18:41+5:302021-01-21T17:19:02+5:30
गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली
भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी १ कोटींचा निधी दान केला आहे. सर्व भारतीयांच्या स्वप्नातील राम मंदिर अयोध्येत उभं राहत आहे आणि त्यासाठी माझ्याकडून व कुटुंबीयांकडून हा निधी दान करण्यात येत आले, असे गंभीरनं सांगितले.
''भव्य व सुंदर राम मंदिर हे सर्व भारतीयांचे स्वप्न आहे. अखेर एक जुना मुद्दा संपुष्टात आला. या मंदिरानंतर एकता आणि शांततेचा मार्ग प्रशस्त होईल. माझ्याकडून व कुटुंबीयांकडून या मंदिरासाठी एक छोटीशी मदत,''असे पूर्व दिल्लीचा खासदार गंभीर म्हणाला.
दिल्ली भाजपानं या मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी शहरात कुपन वाटप करून मोहीम राबवली आहे, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. ''१०, १०० आणि १००० रुपयांचे हे कुपन आहेत आणि शहरातील प्रत्येक घरात जाऊन हा निधी गोळा केला जाईल,''असे दिल्ली बीजेपीचे सरचिटणीस कुलजीत चहल यांनी सांगितले. १००० रुपयांचा निधी हा धानादेशाद्वारे स्वीकारला जाणार आहे.
दरम्यान, गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली. एवढंच नव्हे तर तृतीय पंथीयांनाही लॉकडाऊनच्या काळात त्यानं रेशन पुरवले. आता गंभीरनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे आणि त्याच्या पूर्व दिल्लीच्या मतदार संघात १ रुपयांत जेवणाची सोय करणारी 'जन रसोई' सुरू केली आहे.
त्यानं गांधी नगर येथे जन रसोईच्या पहिल्या कँटिनचे उद्घाटन केले. त्यानंतर अशोक नगर येथे दुसरी कँटिन सुरू केली जाणार असल्याचे, त्याच्या कार्यालयातून सांगण्यात आले. ''कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवं, तो प्रत्येकाचा हक्कच आहे, असे मला वाटते. बेघर आणि निराधार लोकांना दोन वेळचं जेवणही मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटते,''असे गंभीर म्हणाला.