राजकारण करू नका, मणिपूरच्या घटनेने देशातील १४० कोटी जनतेची मान खाली गेली - गौतम गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:41 PM2023-07-21T16:41:08+5:302023-07-21T16:41:17+5:30
manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
नवी दिल्ली : हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर राज्य सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा देशाला लाजवेल अशी घटना घडली. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही जण २ महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढत असल्याचे दिसते. धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली असून हेरोदास मेईतेई असे आरोपीचे नाव आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. तर राजकारण न करण्याचे आवाहन सत्ताधारी करत आहेत.
यावर बोलताना माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान भाजपाखासदारगौतम गंभीरने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच झालेल्या घटनेवर राजकारण न करण्याचे आवाहन देखील गंभीरने केले.
VIDEO | "Whatever happened in Manipur is very shameful. This issue is not just related to Manipur, but the whole country and there should be no politics over it," says BJP leader @GautamGambhir on Manipur viral video. pic.twitter.com/hJGUWlcdLb
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2023
गंभीरनं नेमकं काय म्हटले?
"मणिपूरमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे. यामुळे देशातील १४० कोटी जनतेची मान खाली गेली असून हा केवळ मणिपूरशी संबंधित विषय नसून संपूर्ण देशाचा आहे. त्यामुळे त्यावर राजकारण होता कामा नये", असे गौतम गंभीरने म्हटले आहे.
अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश
मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.