भाजपाचा खासदार म्हणे, योगी आमचे भगवान श्रीकृष्ण अन् मी त्यांचा अर्जुन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 10:19 AM2019-06-03T10:19:24+5:302019-06-03T10:19:53+5:30
भोजपुरी अभिनेता आणि भाजपाचा नवनिर्वाचित खासदार रविकिशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.
लखनऊः भोजपुरी अभिनेता आणि भाजपाचा नवनिर्वाचित खासदार रविकिशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांनी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. योगी आमचे भगवान श्रीकृष्ण आहेत अन् मी त्यांचा अर्जुन असल्याचं रविकिशन म्हणाले आहेत. गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ पाच वेळा खासदार राहिले आहेत. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2017मध्ये पोटनिवडणुका झाल्या, त्या जागेवरून भाजपा पराभूत झाला.
रविकिशन म्हणाले, योगी आदित्यनाथ आमचे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा अर्जुन आहे. मला त्यांच्या नेतृत्वात गोरखपूरला उत्तर भारतातल्या सर्वश्रेष्ठ शहरांमधलं एक बनवायचं आहे. गोरखपूरमध्ये शहरीकरण वाढत चाललं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक शहरांमध्ये उड्डाणपुलांची कमतरता आहे. त्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पाठपुरावा करणार आहे. मला आशा आहे की, वाहतुकीची ही समस्या लवकरात लवकर सुटेल, असंही रविकिशन म्हणाले आहेत.
तसेच गोरखपूरमध्ये फिल्म सिटी बनवण्याचा मानसही रविकिशन यांनी बोलून दाखवला आहे. मी 2014ची निवडणूक जौनपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढलो होतो. पण माझा पराभव झाला. 2017मध्ये रविकिशन यांनी भाजपात प्रवेश घेतला. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनण्याआधी गोरखपूरचे खासदार होते. ते 1998पासून 2017पर्यंत खासदार राहिले आहेत. ते गोरखपीठाचे प्रमुख होते. गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो.