राष्ट्रपतींच्या उदयपूर पॅलेस भेटीवर भाजप खासदाराचा आक्षेप; वडिलांची भेट न घेतल्याने नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:40 PM2024-10-07T14:40:22+5:302024-10-07T14:43:39+5:30
उदयपूर सिटी-पॅलेसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीमुळे राजघराण्यातील सदस्य आणि भाजप खासदाराने नाराजी व्यक्त केली आहे.
President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३ ऑक्टोबर रोजी उदयपूर दौऱ्यावर असताना सिटी पॅलेसला भेट दिल्याने नवा वाद सुरू झाला आहे. सिटी पॅलेसला भेट दिल्याबद्दल भाजप खासदाराने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सिटी पॅलेस ही वादग्रस्त जागा असल्याचे खासदाराने म्हटलं. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपतींना लेखी पत्रही पाठवलं होतं. अधिकाऱ्यांना गोष्टींची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे. तरीही राष्ट्रपतींनी तिथे भेट दिली असे म्हणत भाजप खासदाराने आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गेल्या आठवड्यातच त्यांच्या उदयपूर भेटीचा एक भाग म्हणून मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी उदयपूरच्या माजी राजघराण्याच्या सिटी पॅलेसलाही भेट दिली, जिथे मेवाडच्या माजी राजघराण्याचे सदस्य डॉ. लक्ष्यराज सिंह मेवाड आणि त्यांच्या पत्नी निवृत्ती कुमारी यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा हे देखील उपस्थित होते. मात्र सिटी पॅलेसच्या भेटीवरुन राजसमंदच्या खासदार महिमा कुमारी आणि त्यांचे पती आणि नाथद्वाराचे आमदार विश्वराज सिंह यांनी प्रश्न उपस्थित करत हे आमच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध असल्याचे म्हटलं आहे.
"सिटी पॅलेसवरील न्यायालयीन स्थगिती आणि को-टेम्प्टचा अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. वादग्रस्त जागेच्या दौऱ्याची माहिती ओएसडी आणि प्रोटोकॉल ऑफिसरसह सर्व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली होती. राष्ट्रपतींची प्रतिष्ठा वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला सिटी पॅलेसमध्ये जाणे योग्य नाही," असे खासदार महिमा कुमारी म्हणाल्या. तसेच आमदार विश्वराज सिंह यांनीही याप्रकरणी रोष व्यक्त केला. वडील महेंद्र सिंह मेवाड यांची राष्ट्रपतींनी भेट घेतली नाही, असा आक्षेप विश्वराज सिंह यांनी नोंदवला आहे.
"सिटी पॅलेस ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता असून, त्यावर वाद असून न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे पत्राद्वारे त्यांना सांगण्यात आले. मालमत्तेच्या काही भागावर सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. ही जागा अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे. अशा परिस्थितीत देशाच्या राष्ट्रपती आपल्या कौटुंबिक मालमत्तेवर आल्या आणि घरातील व कुटुंबातील ज्येष्ठांना न विचारता किंवा न भेटता निघून गेल्या. हे तर राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे," असं विश्वराज सिंह मेवाड यांनी म्हटलं.
दरम्यान, मेवाडच्या राजघराण्याचे सदस्य डॉ. लक्ष्यराज सिंह यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती मुर्मू सिटी पॅलेसमध्ये पोहोचले होत्या. लक्ष्यराज सिंह यांची पत्नी निवृत्ती कुमारी या ओडिशाच्या राजघराण्यातील आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी सिटी पॅलेसला भेट दिली होती. उदयपूर आणि ओडिशामधील संबंधांवर दोघांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि लक्ष्यराज सिंह यांच्या पत्नी निवृत्ती कुमारी या मूळच्या ओडिशाच्या आहेत. लक्ष्यराज सिंह यांचे सासरे कनक वर्धन सिंह देव सध्या ओडिशा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि सासू संगीता कुमारी सिंह देव या बालंगीर लोकसभेच्या खासदार आहेत.