"सरपंचाने 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काही गैर नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 02:29 PM2021-12-28T14:29:09+5:302021-12-28T14:31:05+5:30
BJP MP Janardan Mishra : भ्रष्टाचारात काहीच गैर नसल्याचं म्हणत मिश्रा यांनी गावपातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील भाजपाचे एक खासदार आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अजब विधान केलं आहे. गावातील सरपंचाने जर 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला, तर त्यात काहीही गैर नाही. 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. त्यामुळे सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर तरच आमच्याकडे तक्रार करा, असं विधान खासदाराने केला आहे. त्यांच्या या विधानाचा एका व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतं आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खासदार आहे. भ्रष्टाचारात काहीच गैर नसल्याचं म्हणत मिश्रा यांनी गावपातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला आहे. एखाद्या सरपंचाने 15 लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर मला सांगू नका. लाखो रुपये गुंतवून त्यांनं निवडणूक लढलेली असते. पुढील निवडणुकीसाठीही त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही सरपंचाने 15 लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार केला तर तो चुकीचा आहे, असं अजब विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे.
...When people accuse sarpanch of corruption, I jokingly tell them that if corruption is up to Rs 15 lakhs don't come to me...come only if it's (corruption) beyond Rs 15 lakhs: BJP MP Janaradan Mishra in Rewa, Madhya Pradesh (27.12) pic.twitter.com/ImobGWecBH
— ANI (@ANI) December 28, 2021
"15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला तर कृपया तक्रार करू नका"
भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी व्हिडीओमध्ये "गावातील सरपंचाने भ्रष्टाचार केला, अशी तक्रार घेऊन नागरिक जेव्हा माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांना म्हणतो की, त्यांनी 15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर कृपया आमच्याकडे तक्रार करू नका. जर सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला असेल, तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. कारण सरपंचाने निवडणुकीत 7 लाख रुपये गुंतवलेले असतात. तसेच पुढील निवडणुकीसाठी त्याला आणखी 7 लाखांची गरज असते. महागाई वाढली तर आणखी 1 लाख जोडा. त्यामुळे ते 15 लाख रुपयांचा घोळ करत असतील, तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. हीच समाजाची सद्यस्थिती आहे" असं म्हटलं आहे.
जनार्दन मिश्रा यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. काही महिन्यांपूर्वी मिश्रा यांनी शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूली संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. शेतकऱ्यांकडे कर्जवसूलीसाठी कोणी आलं तर त्यांचे हात तोडू आणि गळा दाबून मारून टाकू असं जनार्दन मिश्रा यांनी म्हटलं होतं. पक्षाच्यावतीने 'किसान आक्रोश आंदोलना'चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मिश्रा यांनी असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.