"मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा...", भाजप खासदार कंगना रणौतच्या विधानाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:55 PM2024-07-12T12:55:02+5:302024-07-12T12:55:51+5:30
Kangana Ranaut : भेटण्यासंदर्भात कोणता विषय आहे, तो सुद्धा लेखी स्वरूपात घेऊन यावा, असेही कंगना राणौतने सांगितले.
भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही एका वक्तव्यानंतर चर्चेत आली आहे. जर कोणाला मला भेटायचे असेल तर त्याने मंडी लोकसभा मतदारसंघातील आधार कार्ड आणावे लागेल, असे कंगना राणौतने म्हटले आहे. तसेच, भेटण्यासंदर्भात कोणता विषय आहे, तो सुद्धा लेखी स्वरूपात घेऊन यावा, असेही कंगना राणौतने सांगितले. त्यामुळे तिच्या या वक्तव्यानंतर हिमाचल प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
कंगना राणौतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, "माझं मंडी सदरमध्ये ऑफिस आहे. हा त्याचा पत्ता आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.अशा परिस्थितीत भेटायला येणाऱ्या लोकांना मंडी परिसराचे आधार कार्ड सोबत आणावे लागेल. तसेच, तुमच्या संसदीय कामकाजासाठी तुम्हाला जी काही अडचण असेल, ती तुम्हाला लेखी स्वरूपात आणावी लागेल, जेणेकरून लोकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. मोठ्या संख्येने लोक येथे येतात, त्यामुळे असे केले जात आहे."
कंगना राणौत पुढे म्हणाली की, "तुम्ही मंडीचे असाल तर मंडी सदर येथील कार्यालयात या. तुम्ही हिमाचलचे असाल तर कुल्लू-मनाली येथील माझ्या घरी येऊन भेटा. जर आपण एखाद्या समस्येवर एकत्र चर्चा केली तर ती सोडवणे सोपे जाते. तसेच, संसदीय मतदारसंघाशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही केंद्राशी संपर्क साधू शकता. राष्ट्रहिताशी निगडीत काही बाब आहे असे वाटत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमचा आवाज आहोत आणि लोकसभेत आवाज उठवू."
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात कंगना राणौत हिच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत कंगना राणौतला ५,३७,०२२ मते मिळाली तर विक्रमादित्य सिंह यांना ४,६२,२६७ मते मिळाली. कंगना राणौतने पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि ७२ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला.