"अविवाहित तरुणांची मला यादी द्या, मी सर्वांची लग्न करून देईन"; भाजपा नेत्याची अनोखी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:52 PM2023-07-03T19:52:35+5:302023-07-03T20:31:07+5:30
खासदार किरोडीलाल मीणा यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
राज्यसभा खासदार डॉ. किरोडीलाल मीणा हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा मीणा यांचं एक विधान चर्चेत आलं आहे. करौली येथे आयोजित कार्यक्रमात एक अनोखी घोषणा केली आहे. "जेवढे पण अविवाहित तरुण आहेत. त्या सर्वांची यादी मला द्या. मी त्या सर्वांचं लग्न माझ्या महुआ परिसरात करून देईन" असं म्हटलं आहे. खासदार किरोडीलाल मीणा यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरोडीलाल मीणा रविवारी करौली येथे पोहोचले होते. तेथे त्यांनी मामचरी गावात ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी ही अनोखी घोषणा केली. कार्यक्रमात खासदार मीणा यांनी आमदार आणि मंत्री रमेश मीणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मीणा म्हणाले की, येथील लोक लुटण्यात गुंतले आहेत. यामध्ये मंत्र्यांचा भाऊ, मंत्र्यांचा जावई, मंत्र्यांचा मेहुणा, मंत्र्यांची बहीण असे सगळे कुटुंब लुटण्यात गुंतलं आहे. त्यांनी संपूर्ण राजस्थान लुटलं आहे. किरोडीलाल यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, "गेहलोत सरकारमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा खाण घोटाळा झाला आहे."
"राजस्थानमध्ये 66 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे." मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर निशाणा साधत खासदार मीणा म्हणाले की, "ईआरसीपीचा प्रकल्प केवळ 37 हजार कोटींचा आहे. त्यांनी 66 हजार कोटींच्या घोटाळ्यातील निम्मेही वाचवले असते तर आज चंबळचे पाणी मामचरी धरणापर्यंत पोहोचले असते." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.