“आता CM अरविंद केजरीवाल यांचा नंबर”; संजय सिंह यांच्या अटकेनंतर भाजप नेते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:09 PM2023-10-05T17:09:28+5:302023-10-05T17:12:01+5:30
देव सगळे पाहत आहे, लवकरच अरविंद केजरीवाल यांचा नंबर येऊ शकतो, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
BJP Vs CM Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक करीत आज ईडीने सत्ताधारी आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा हादरा दिला. मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ मद्य धोरण घोटाळ्यातील दुसरी सर्वात मोठी अटक ठरली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे लवकरच या घोटाळ्याचे सूत्रधार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचतील, असा दावा भाजपचे नेते करीत आहेत. यातच भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आता पुढचा नंबर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा असून, लवकरच ते कारागृहात असतील, असा दावा केला आहे.
संजय सिंह यांची अटक ही दिल्लीतील जनतेचा विजय असून, सत्येंद्र जैन यांच्यापासून सुरू झालेला भ्रष्टाचाराचा हा खेळ मनिष सिसोदिया यांच्यानंतर आता संजय सिंह यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक होईल. ते तुरुंगात दिसतील, अशी प्रतिक्रिया मनोज तिवारी यांनी दिली आहे. गुन्हा करताना आरोपीला असे वाटत असते की, आपण जे काही करत आहोत, ते कुणाच्या नजरेत येत नाही. मात्र, देव सर्व काही पाहत असतो, असेही मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराविरोधात लढणारे आज भ्रष्टाचारात बुडालेत
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही यावर भाष्य करताना अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. भारतातील भ्रष्टाचारविरोधात एकेकाळी लढाई सुरू केलेल्या व्यक्ती आता भ्रष्टाचारात बुडाल्याचे दिसत आहे. या प्रकरणातील मास्टरमांइड बाहेर असून, लवकरच तोही कारागृहात असल्याचे पाहायला मिळेल, असे सूतोवाच अनुराग ठाकूर यांनी केले.
दरम्यान, आता दिल्लीतील जनतेला न्याय मिळू लागला आहे. असा भ्रष्टाचार करणारे आणि ते कुणाला कळणार नाही असा विचार करणारे अरविंद केजरीवालच असू शकतात. कमिशन २ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत नेले, हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. आप खासदार संजय सिंह सातत्याने सांगत आहेत की, त्यांच्या घरात काहीही सापडले नाही, परंतु त्यांनी सांगावे की चारा घोटाळा, 2G घोटाळा यातील आरोपींच्या घरात पैसा सापडला होता का, अशी विचारणा भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केली आहे.