शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 09:07 AM2021-06-15T09:07:13+5:302021-06-15T09:07:47+5:30

शिवसेनेवर सातत्यानं टीका करणाऱ्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता

Bjp mp narayan rane flies to delhi might get ministry in modi cabinet | शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

Next

नवी दिल्ली: शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं शरसंधान साधणाऱ्या नारायण राणेंना मोदी सरकारकडून स्पेशल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार असलेले नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. राणे त्यांच्या दिल्लीवारीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. नारायण राणे सातत्यानं ठाकरे सरकारवर शाब्दिक प्रहार करत आहेत. यासोबतच पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं आतापासूनच सर्व ताकद पणाला लावली आहे. राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

अमित शहांचा दौरा फलदायी?
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात आले होते. त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. या भेटीत शहांनी राणेंच्या कामाचं आणि त्यांच्या कार्यशैलीचं अगदी तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपत आलेले राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सातत्यानं शाब्दिक हल्ले करतात. राणे आक्रमक नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. केंद्रात जवळपास मंत्रालयं आहेत. सध्याच्या घडीला ६० मंत्र्यांकडे त्यांची जबाबदारी आहे. अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे अतिरिक्त प्रभार आहे. त्यामुळे लवकरच नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. शिवसेना, शिरोमणी अकाली दलानं साथ सोडल्यानं त्यांच्या वाट्याची दोन मंत्रिपदंही रिक्त आहेत.

Web Title: Bjp mp narayan rane flies to delhi might get ministry in modi cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.