पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 12:26 PM2018-01-30T12:26:29+5:302018-01-30T13:55:19+5:30
पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचं निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.
नवी दिल्ली - पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचं दिल्लीत निधन झालं आहे. पालघरचे खासदार ॲड. चिंतामण वनगा यांचे मंगळवारी (29 जानेवारी) दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांना राममनोहर लोहिया (दिल्ली) रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात असताना त्यांची प्राणज्योत मालवली. राजकरणातील संत माणूस असलेले वनगा यांच्या जाण्याने पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
तीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार व पालघर जिल्ह्यातील भाजपचा चेहरा असलेले वनगा १९९० ते १९९६ या काळात भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते. 11 व्या लोकसभेमध्ये १९९६ साली सर्वप्रथम खासदार झाले. १९९८ च्या १२ व्या लोकसभेसाठी झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा १९९९ च्या १३ व्या लोकसभा निवडणुकीत वनगा विजयी झाले. २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. या नंतर त्यांनी २००९ साली विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली व आमदार झाले. २०१४ सालच्या निवडणुकीत आमदार असतानाच पुन्हा लोकसभा निवडणूक लढविली व खासदार झाले.
लोकसभेत चिंतामणी या टोपण नावाने ओळखले जायचे. दिल्लीहून त्यांचं पार्थिव विमानाने मुंबई येथे आणण्यात येईल. बुधवार (31 जानेवारी) सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव तलासरी येथे ठेवण्यात येणार असून व अंत्यविधी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तलासरी येथे होणार आहे.