माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; गोडसेच्या विधानावर प्रज्ञासिंह ठाकूरांचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 01:04 PM2019-11-29T13:04:47+5:302019-11-29T13:21:38+5:30

महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली.

bjp mp pragya singh thakur apologize in lok sabha on nathuram godse comment | माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; गोडसेच्या विधानावर प्रज्ञासिंह ठाकूरांचा माफीनामा

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; गोडसेच्या विधानावर प्रज्ञासिंह ठाकूरांचा माफीनामा

Next

नवी दिल्लीः महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. त्यानंतर भाजपानंही संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीवरून त्यांना हटवलं. आजही संसदेत गदारोळ झाला असता, प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागितली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, माझ्या विधानानं जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागते, असंही त्या म्हणाल्या आहे. संसदेतील एका सदस्यानं मला दहशतवादी म्हटलं आहे. हा माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. न्यायालयात माझ्याविरोधात अजूनही आरोप सिद्ध झालेले नाहीत.

माझा कोणताही दोष नसताना मला दहशतवादी ठरवणं कायद्याच्या विरोधात आहे. तरीही मी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागते. संसदेत प्रज्ञा सिंह ठाकूरांच्या विधानानं काँग्रेसनं मोठा गोंधळ घातला आहे. महात्मा गांधींची जय अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या आहेत. तर भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी प्रज्ञासिंह ठाकूरांना ट्विटरवरून दहशतवादी म्हटल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


आमची फक्त एकच मागणी आहे, कोणत्याही अटीशिवाय प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी केली आहे. 

दुसरीकडे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसनं शिवसेनेबरोबर जात केलेल्या सत्ता स्थापनेवर टीका केली आहे. काँग्रेसनं शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केलेलं आहे. शिवसेनेनंही सामनामधून नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आहे. काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत लाचार होऊ शकते, असं निशिकांत दुबे म्हणाले आहेत.

तत्पूर्वी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणणाऱ्या भाजप खासदार व मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाचा धिक्कार करीत भाजपाने त्यांची संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीच्या सदस्यपदावरून गुरुवारी हकालपट्टी केली होती. भाजप संसदीय समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासही त्यांना बंदी घातली आहे. भाजपाने प्रज्ञा ठाकूर यांचे प्रकरण पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे पाठवले होते. त्यांना पक्षातून काढून टाकावे, असे भाजपाच्या अनेक नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, त्या खासदार असल्याने शिस्तभंग समितीच त्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: bjp mp pragya singh thakur apologize in lok sabha on nathuram godse comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.