कोर्टासमोर आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 03:09 PM2021-07-09T15:09:42+5:302021-07-09T15:10:45+5:30
भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल कोर्टमध्ये खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एका लग्न सोहळ्यात त्या ठेका धरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आहे.
भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल कोर्टमध्ये खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एका लग्न सोहळ्यात त्या ठेका धरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याचं आयोजन देखील प्रज्ञा ठाकूर यांनीच केलं होतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर काँग्रेस नेत्यांकडूनही जोरदार टीका केली जात आहे.
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आजारी असल्याचं कारण देत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टासमोर हजर न राहण्याची सवलतीची विनंती कोर्टासमोर केली होती. नुकताच प्रज्ञा ठाकूर यांचा एका विवाहसोहळ्याच्या निमित्तानं डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या भोपाळ येथील निवासस्थानावरच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रज्ञा ठाकूर यांनी दोन गरीब मुलींचा विवाह स्वत:च्या राहत्या घरी आयोजित केला होता. या कार्यक्रमात ५१ वर्षीय प्रज्ञा ठाकूर गाण्याच्या तालावर नाचताना पाहायला मिळत आहेत.
हमारी भोपाल की सांसद बहन प्रज्ञा ठाकुर को जब भी बास्केट बॉल खेलते हुए , बग़ैर सहारे के चलते हुए या इस तरह ख़ुशी से झूमते हुए देखते है तो बड़ी ख़ुशी होती है…? pic.twitter.com/MR01Gumnun
— Narendra Saluja (@NarendraSaluja) July 7, 2021
प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या मदतीसाठी दोन्ही वधू मुलींच्या वडिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले. "मी अतिशय गरीब आहे. माझ्याकडे माझ्या मुलीचा विवाह करण्यासाठी पैसे नव्हते. पण प्रज्ञा ठाकूर यांनी आमची मदत केली. देवी माँ त्यांना उदंड आयुष्य देवो. मी खूप खूश आहे", अशी भावना वधुच्या वडिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, साध्वींच्या व्हिडिओवर काँग्रेस नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. "भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना आम्ही बास्केटबॉल खेळताना पाहिलं. त्यांना कोणताही आधार न घेता चालताना पाहिलं आणि आम्हाला खूप बरं वाटलं. आतापर्यंत आम्ही त्यांना फक्त व्हिलचेअरवर पाहत होतो. पण बास्केटबॉल खेळताना पाहिलं तर खूप आनंद झाला. त्यांना झालेल्या दुखापतीमुळे त्या चालू किंवा फिरू शकणार नाहीत असं सांगण्यात येत होतं. ईश्वर त्यांना नेहमी स्वस्थ ठेवो", असं खोचक ट्विट मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी केलं होतं.