पूरग्रस्त भागाची पाहणी करताना भाजपाचे खासदार नदीत पडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:31 PM2019-10-03T13:31:19+5:302019-10-03T13:34:47+5:30
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमाण घातले आहे.
पटना : बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजापचे पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील खासदार राम कृपाल यादव यांनी बुधवारी आपल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी धनरुआ येथील रमणी बिगहा भागात पुराची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांची बोट उलटल्यामुळे ते नदीत पडले. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी त्यांना वाचविले. या घटनेत राम कृपाल यादव जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती राम कृपाल यादव यांनी आपल्या ऑफिशल सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे.
राम कृपाल यादव यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, "पाटलीपुत्र मतदार संघातील पूरग्रस्त भागाची सकाळपासून पाहणी करत आहे. लोकांचे दु:ख जवळून पाहत आहे. मदतीसाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले जात आहेत. काही भागातील परिस्थिती खूपच वाईट आहे. लोक हैराण आहेत. लवकरच त्यांची समस्या दूर होईल. यादरम्यान, मी आज स्वत: दुर्घटनेत सापडलो. धनरुआमधील रमणी बिगहामध्ये पाण्याची खोली जास्त होती. कोणत्याही व्यवस्थित बोटीची व्यवस्था झाली नव्हती. स्थानिक लोकांनी चचरीवाल्या बोटीची व्यवस्था केली होती. या बोटीतून जाताना पाण्याची क्षमता जास्ता असल्यामुळे बोट बुडाली. यावेळी लोकांनी मला लवकर बाहेर काढले. यात किरकोळ जखम झाली आहे. मात्र, लोकांच्या आशीर्वादामुळे सुरक्षित आहे."
#WATCH Bihar: BJP MP Ram Kripal Yadav falls into the water after the makeshift boat he was in, capsized in Masaurhi, Patna district, during his visit to the flood affected areas yesterday. He was later rescued by the locals. (02.10.2019) pic.twitter.com/iwI4OdNGiH
— ANI (@ANI) October 3, 2019
दरम्यान, बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमाण घातले आहे. या पावसामुळे आलेल्या पुरात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, गया, भोजपूर, भागलपूर आदी जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून, तेथील पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवावी, असा आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रशासनाला दिला आहे.