भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; फ्लॅटमध्ये फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 10:32 AM2021-03-17T10:32:52+5:302021-03-17T10:35:01+5:30
bjp mp ramswaroop sharma commits suicide: हिमाचलचे खासदार रामस्वरुप शर्मांचा मृतदेह दिल्लीतल्या फ्लॅटमध्ये सापडला; आत्महत्येचा संशय
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतल्या आरएमएल रुग्णालयाजवळ असलेल्या खासदारांची निवासस्थानं आहेत. त्यातल्या एका फ्लॅटमध्ये शर्मा यांचा मृतदेह आढळून आला. शर्मा यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
आरएमएल रुग्णालयाजवळ असलेल्या गोमती अपार्टमेंटमध्ये (खासदार निवासस्थान) रामस्वरूप शर्मांनी आत्महत्या केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना सकाळी साडे आठच्या सुमारास मिळाली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह फासाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. आत्महत्येमागचं कारण अद्याप तरी समजू शकलेलं नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आज सकाळी शर्मा यांची खोली उघडण्यास गेलो, तेव्हा तो आतून बंद होता. वारंवार आवाज दिल्यानंतरही त्यांनी दरवाजा उघडला नाही, अशी माहिती शर्मा यांच्या कर्मचाऱ्यानं दिली. दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत दिसला, असं कर्मचाऱ्यानं सांगितलं.
शर्मा यांच्या निधनामुळे भाजपनं आज होणारी संसदीय दलाची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. शर्मा हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातल्या जोगिंदरनगरचे रहिवासी होते. त्यांनी सलग दोनदा लोकसभेची निवडणूक जिंकली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. खासदार होण्याआधी त्यांनी मंडी जिल्ह्याचे भाजप सचिव आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशचे भाजप सचिव म्हणून काम केलं.