भरधाव वेगात कार चालवून भिंतीला धडक; भाजपा खासदाराचा मुलगा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:54 AM2019-08-16T10:54:42+5:302019-08-16T10:58:18+5:30

पोलिसांकडून खासदार पुत्राला अटक; खासदाराच्या ट्विटमध्ये मोदींना टॅग

BJP MP Roopa Gangulys Son Arrested For rash driving | भरधाव वेगात कार चालवून भिंतीला धडक; भाजपा खासदाराचा मुलगा अटकेत

भरधाव वेगात कार चालवून भिंतीला धडक; भाजपा खासदाराचा मुलगा अटकेत

Next

कोलकाता: भाजपा खासदार रुपा गांगुली यांचा मुलगा आकाशला पोलिसांनी अटक केली आहे. आकाशनं भरधाव वेगात कार चालवत एका भिंतीला धडक दिली. यावेळी आसपास असलेल्या अनेकांचा जीव थोडक्यात बचावला. आकाश मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. त्यानंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. 

गुरुवारी रात्री आकाशच्या काळ्या रंगाच्या सेदान कारनं गोल्फ गार्डन परिसरातील एका क्लबच्या भिंतीला धडक दिल्याची माहिती पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली. यावेळी कारचा वेग अतिशय जास्त होता आणि अनेकांचे प्राण अगदी थोडक्यात वाचले, असं स्थानिकांनी सांगितलं. कारनं भिंतीला धडक दिल्यानंतर भिंतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे आकाश आतच अडकला. भरधाव येणारी कार पाहताच अनेकजण बाजूला झाले. त्यामुळे यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. 

कारनं भिंतीला धडक दिल्याची माहिती समजताच जवळच राहणाऱ्या आकाशच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आकाशला कारमधून बाहेर काढलं. आकाशनं मद्यधुंद अवस्थेत भिंतीला धडक दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यानंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं. यानंतर आज सकाळी जाधवपूर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२७, २७९ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत आकाशला अटक केली. 

यानंतर खासदार रुपा गांगुलींनी एक ट्विट करत कायदा त्याचं काम करेल, असं म्हटलं. 'माझ्या मुलाच्या कारला घराजवळ अपघात झाला. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. त्यात कोणताही पक्षपात किंवा राजकारण होऊ नये. माझं माझ्या मुलावर प्रेम आहे आणि आम्ही त्याची काळजी घेऊ. पण कायद्याला त्याचं काम करू द्यावं,' असं ट्विट त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे. 'मी काहीही चुकीचं करत नाही आणि सहनही करत नाही. मी बिकाऊ नाही,' असं गांगुलींनी त्यांच्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे. 
 

Web Title: BJP MP Roopa Gangulys Son Arrested For rash driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.