हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोटं छाटली होती, ते देशभक्त नव्हते; साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 08:38 AM2021-06-26T08:38:10+5:302021-06-26T08:40:01+5:30
भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हेमंत करकरे यांनी आमचे आचार्य ज्यांनी आम्हाला इयत्ता आठवीपर्यंतचं शिक्षण दिलं होतं. त्यांची बोटं करकरे यांनी छाटली होती, असा दावा साध्वींनी केला आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर सीहोर येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या. देशात एक आणबाणी १९७५ साली लागू करण्यात आली होती आणि दुसरी आणीबाणी तेव्हा लागू झाली जेव्हा २००८ साली मालेगाव बॉम्ब ब्लास्टप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला त्यांनी तुरुंगात टाकलं, असं त्या म्हणाल्या. "लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानतात पण मी तसं मानत नाही. ते देशभक्त नव्हते. देशात जे वास्तवात देशभक्त असतात त्यांना देशभक्त मानलं जात नाही", असं साध्वी म्हणाल्या.
हेमंत करकरे देशभक्त नाहीत
"ज्यांनी मला इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण दिलं त्या शिक्षकाची बोटं करकरे यांनी छाटली होती. जे लोक हेमंत करकरे यांना देशभक्त संबोधतात अशा हेमंत करकरेने लोकांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षकांची बोटं छाटण्याचं काम केलं होतं. हे कुणासाठी केलं होतं? आणि ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?", असं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.