"पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बांगलादेशातील हिंदू वाचले", भाजप खासदाराचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:25 PM2024-09-04T14:25:48+5:302024-09-04T14:26:40+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्राण वाचले, असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर मोठा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्राण वाचले, असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.
बांगलादेशात जे काही घडले, ती अत्यंत चिंतेची बाब आहे. तिथल्या घटना खूप वेदनादायी आहेत. नरेंद्र मोदींनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अल्पसंख्यांकांबाबत रात्रंदिवस आटा पिटा करणारे गप्प बसले आहेत, असे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
खासदार साक्षी महाराज यांनी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडीतील नेते अल्पसंख्यांकांबद्दल बोलतात. मात्र, आजपर्यंत त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या बाजूने कोणतेही खुले विधान केलेले नाही.
भारतातील जनतेने हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे समर्थक आणि रक्षक कोण आहेत, असे खासदार साक्षी महाराज म्हणाले. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की हिंदू कमी झाले तर त्यांना मारहाण केली जाईल. हिंदू कमी झाले तर देशाची फाळणी होईल, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे खासदार साक्षी महाराज सांगितले.
याचबरोबर, देशातील हिंदूंनी संघटित राहण्याची गरज आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे, असे खासदार साक्षी महाराज सांगितले. तसेच, पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर खासदार साक्षी महाराज म्हणाले की, जर आपण तिथली लढाई लढत असू तर जनतेने लक्ष देण्याची गरज आहे.
बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले
दरम्यान, काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. मात्र, येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात आले. तसेच, गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले होत असल्याचे दिसून आले.