"कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे भरकटलेले शेतकरी; काहींच्या पोटात दुखतंय, त्यांचा हेतू वेगळाच"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 12:16 PM2021-01-13T12:16:51+5:302021-01-13T12:20:40+5:30
Sakshi Maharaj And Farmers Protest : साक्षी महाराजांनी यावेळी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
उन्नाव - भाजपाचे खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे. पुन्हा एकदा ते आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. साक्षी महाराजांनी यावेळी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. "कृषी कायद्यांचा विरोध नाही हे तर सीएए, एनआरसी, कलम 370 चं दु:ख" असं मंगळवारी आपला वाढदिवस साजरा करत असताना साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे काही भरकटलेले शेतकरी आहेत असं देखील म्हटलं आहे. तसेच अखिलेश यादव यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. त्यांना टोला लगावला आहे.
"दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा विरोध नाही तर सीएए, एनआरसी आणि कलम 370 चं दु:ख बाहेर पडत आहे. कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे काही भरकटलेले शेतकरी आहेत. काही लोक तर शेतकरीही नाहीत तर मोठे व्यापारी आहेत. खरे शेतकरी आपापल्या शेतात काम करत आहेत. तुम्हाला शेतकऱ्यांना पाहायचंय तर गंज मुरादाबादमध्ये शेतकरी संमेलन आहे, तुम्ही चला मी दाखवतो. ते कसे शेतात काम करत आहेत. अशाच लोकांच्या पोटात दुखतंय. संपूर्ण देशात फक्त दोन ते तीन ठिकाणी आंदोलन सुरू आहे."
"कृषी कायद्यांचा विरोध नाही हे तर सीएए, एनआरसी, कलम 370 चं दु:ख"
"पंजाबमधून लोक सिंघु सीमेवर, राजस्थानमधून हरयाणाच्या सीमेवर येत आहेत. याचं कारण म्हणजे, दोन्ही ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे. हा कृषी कायद्यांचा विरोध नाही तर निशाणा दुसरीकडेच आहे आणि यांचा हेतूही काही वेगळाच आहे. सीएए, एनआरसीचं हे दु:ख आहे. कलम 370 हटवण्याचं हे दु:ख आहे आणि अयोध्येमध्ये जे प्रभू श्री राम मंदिर उभारलं जातंय त्याचं हे दु:ख आहे" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी अखिलेश यादव यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. अखिलेश कधी रामभक्त असल्याचं दाखवतात तर कधी रामविरोधी... योग्य मार्ग कोणता हेच त्यांना समजत नाही. मात्र त्यांनी आता योग्य मार्गावर चालायला हवं असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा"
"भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा" असं साक्षी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. बागपतमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी असं म्हटलं. भारतात मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर निशाणा साधला. "सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या तुलनेत भारतात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 32 कोटी आहे. तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या 20 कोटींपर्यंत पोहचली आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्याक दर्जा तत्काळ प्रभावाने संपुष्टात यावा" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं होतं.
काँग्रेसच्या बैठकीत गदरोळ, सोशल मीडियावर Video जोरदार व्हायरलhttps://t.co/cZudJDF1v0#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) January 13, 2021