भाजपाचे खासदार संवरलाल जाट यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 08:17 AM2017-08-09T08:17:27+5:302017-08-09T09:20:14+5:30
भाजपाचे खासदार संवर लाल जाट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
नवी दिल्ली, दि. 9 - भाजपाचे खासदार संवरलाल जाट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपूर्वी प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना एअर अॅम्ब्युलन्सनं नवी दिल्ली येथे आणण्यात आले होते. दरम्यान, 22 जुलै रोजी जयपूर येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक सुरू असतानाच खासदार संवरलाल जाट हे बेशुद्ध पडले. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जाट यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले व ते बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना तातडीनं एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं नवी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
कोण होते संवरलाल जाट ?
संवरलाल जाट हे अजमेरमधील खासदार होते. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 पर्यंत त्यांनी मोदी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री म्हणून केंद्रात कार्य केले आहे. संवरलाल यांचा जन्म 1955मध्ये राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील गोपालपुरा गावात झाला. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवीधर झाल्यानंतर ते राजस्थान विद्यापिठात शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. अजमेर जिल्ह्यातील भिनाई विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
1993, 2003 आणि 2013 मध्ये ते राजस्थान सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपद सोपवण्यात आले होते. मात्र फेरबदलानंतर त्यांच्याकडील मंत्रिपद घेण्यात आले होते.
BJP MP from Ajmer and former Union minister Sanwar Lal Jat passes away in Delhi pic.twitter.com/diKdckUQ53
— ANI (@ANI) August 9, 2017