'PM नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद', भाजप खासदाराचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:32 PM2023-01-12T19:32:29+5:302023-01-12T19:33:01+5:30
भाजपचे अनेक नेते उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करतात, त्यांची तुलना महापुरुषांशी करतात.
Narendra Modi: भाजपचे अनेक नेते उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती करतात, त्यांची तुलना देश आणि जगातील मोठ्या व्यक्तींशीही करतात. यातच एका भाजप खासदारानं पंतप्रधान मोदींची तुलना स्वामी विवेकानंदांशी (Swami Vivekanand) केली आहे. पीएम मोदी हे आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद असल्याचं वक्तव्य भाजप खासदार सौमित्र खान (MP Saumitra Khan) यांनी केलं आहे. त्यामागे युक्तिवाद करताना खासदार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेत घालवलं आहे, त्यामुळेच त्यांना आधुनिक भारताचे विवेकानंद म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
भाजप खासदार मोदींबद्दल काय म्हणाले?
पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे भाजप खासदाराने हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुकही केलं. सौमित्र खान म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म स्वामी विवेकानंदांच्या नव्या रुपात झाला आहे. स्वामीजी हे आपल्यासाठी देवासारखे आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधानांनी आपलं आयुष्य देशसेवेत घालवलं आहे. मला वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत."
कोण आहेत सौमित्र खान?
सौमित्र खान हे बिशनपूरचे खासदार आहेत, यापूर्वी ते आमदारही राहिले आहेत. ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय सौमित्र हे पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्षही आहेत. सध्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.
स्वामी विवेकानंदांची जयंती उत्साहात साजरी
स्वामी विवेकानंदांच्या 161 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये रॅली काढण्यात आल्या आणि रामकृष्ण मिशन (RKM) च्या विविध केंद्रांवर प्रार्थना सत्रांचे आयोजन करण्यात आलं. अनेक सामाजिक संस्थांनी बंगालच्या विविध भागात या निमित्तानं रॅली काढल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं.