"लाल किल्ल्यातील हिंसाचारामागे भाजप नेत्याचा हात? सत्याचा शोध घ्या"; सुब्रमण्यम स्वामी
By देवेश फडके | Published: January 27, 2021 03:25 PM2021-01-27T15:25:51+5:302021-01-27T15:27:41+5:30
लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला, त्यामागे 'पीएमओ'च्या जवळील भाजप नेत्याचा हात आहे, असा संशय सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा आधार घेत सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी घेतला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीतआंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या हिंसाचारानंतर आंदोलकांनी लाल किल्ल्यात शिरून मोठी तोडफोड केली. पोलिसांनाही मारहाण केल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठे विधान केले आहे.
लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला, त्यामागे 'पीएमओ'च्या जवळील भाजप नेत्याचा हात आहे, असा संशय सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा आधार घेत सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी घेतला आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे. कदाचित त्यात काहीही तथ्य नसेल. ते खोटेही असू शकेल किंवा शत्रूंच्या आयटी सेलकडून वावड्या उठवल्या जात असतील की, 'पीएमओ'च्या जवळील व्यक्तीने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले. नीट तपासून माहिती घ्यावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
There is a buzz, could be fake, or fake IDs of enemies that a BJP member close to high places in PMO acted as a agent provocateur in the Red Fort drama. Please check out and inform
— Subramanian Swamy (@Swamy39) January 27, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
शेतकरीआंदोलनातील हिंसाचारात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू हा भाजप खासदार सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाला होता, अशा आशयाचे ट्विटही सुब्रमण्यम स्वामी यांनी रिट्विट केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले आहे.
मोदी आणि शाह यांची प्रतिमा मलीन
राज्यसभेचे सदस्य असलेल्या खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये, दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी प्रतिमा डागाळली गेली आहे, असे मत सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केले आहे. याशिवाय त्यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारवरही जोरदार टीका केली.
दरम्यान, दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. योगेंद्र यादव, भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मात्र, दीप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.