माझं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना वाचवतंय; सुब्रमण्यम स्वामींकडून घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:07 AM2018-10-25T09:07:15+5:302018-10-25T09:13:34+5:30
'CBIनंतर आता EDचे अधिकारी रडारवर असतील'
नवी दिल्ली: सीबीआयमधील अंतर्गत संघर्ष टोकाला गेल्यावर मोदी सरकारनं दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरुन दूर केलं. यावरुन आता भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. माझं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहे. सीबीआयनंतर आता पुढची कारवाई अंमलबजावणी संचलनालयातील (ईडी) अधिकाऱ्यांवर होईल, असं स्वामी यांनी म्हटलं आहे.
सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर मोदी सरकारनं हस्तक्षेप केला. या दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरुन दूर करण्याची कारवाई सरकारकडून करण्यात आली. सरकारच्या या कारवाईवर सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली. सीबीआयनंतर पुढचा क्रमांक ईडीचा असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. सीबीआयपाठोपाठ ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच संपेल, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
The players in the CBI massacre are about to suspend ED’s Rajeshwar so that he cannot file the chargesheet against PC. If so I will have no reason to fight the corrupt since my govt is hell bent on protecting them. I shall then withdraw from all the corruption cases I have filed.
— Subramanian Swamy (@Swamy39) October 24, 2018
सीबीआय नरसंहारमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आता अंमलबजावणी संचलनालयातील अधिकारी राजेश्वर सिंह यांना निलंबित करणार आहेत, असा खळबळजनक दावा राज्यसभेतील खासदार स्वामी यांनी केला. 'पीसीच्या विरोधात आरोपपत्र दाखल होऊ नये, यासाठी सीबीआय नरसंहार घडवणारे काहीजण ईडीच्या राजेश्वर यांचं निलंबन करतील. असं घडल्यास माझ्या भ्रष्टाचारविरोधातील लढाईला काहीच अर्थ उरणार नाही. कारण माझं सरकारच भ्रष्टाचाऱ्यांना वाचवू पाहत आहे,' असा गंभीर आरोप स्वामी यांनी म्हटलं. स्वामी बहुतेकदा पी. चिदंबरम यांचा उल्लेख पीसी असा करतात. ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह सध्या चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत आहेत.