दलितांच्या घरी जेवायला जाऊन त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? खासदाराचा भाजपाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 12:27 PM2018-05-05T12:27:14+5:302018-05-05T12:41:19+5:30
हे म्हणजे एखाद्या डॉक्टरने पोटाचा आजार असलेल्या रुग्णाला तापाचे औषध देण्यासारखे आहे, अशी टिप्पणी उदित राज यांनी केली.
नवी दिल्ली: भाजपाचे नेते दलितांच्या घरी जेवायला गेल्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल भाजपाचे खासदार उदित राज यांनी उपस्थित केला आहे. अशा गोष्टी केल्याने दलित समाजाच्या आकांक्षा पूर्ण होणार नाहीत. दलित समाजातील तरूणांना रोजगार हवेत, त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, या त्यांच्या अपेक्षा आहेत.
भाजपाच्या नेत्यांनी दलितांच्या घरी जेवायला किंवा राहायला जाण्याबद्दल माझा आक्षेप नाही. परंतु हे समस्येचे उत्तर आहे का? भाजपाच्या नेत्यांनी आपल्या घरी जेवायला यावे म्हणून दलित समाज भारत बंदमध्ये सहभागी झाला होता का? ते स्वत:च्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि आरक्षणासाठी आंदोलन करत होते. अशा परिस्थितीत भाजपा नेत्यांनी त्यांच्या घरी जेवायला जाण्याची कृती म्हणजे एखाद्या डॉक्टरने पोटाचा आजार असलेल्या रुग्णाला तापाचे औषध देण्यासारखे आहे, अशी टिप्पणी उदित राज यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ग्राम स्वराज अभियानाचा भाग म्हणून भाजपा आमदार सुरेश राणा दलित व्यक्तीच्या घरी जेवायला गेले होते. मात्र, याठिकाणी जाताना आमदार महाशय स्वत:बरोबर हॉटेलमधील जेवण आणि भांडी घेऊन गेले होते. त्यामुळे हे सर्व काही पूर्वनियोजित आणि एकप्रकारचा दिखावा असल्याची टीका भाजपावर करण्यात आली होती.