भाजपा खासदाराने फडकावला उलटा तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 05:18 PM2017-08-15T17:18:01+5:302017-08-15T17:21:56+5:30
तिरंग्याचा अपमान होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असताना, भाजपा खासदाराने मात्र उलटा झेंडा फडकावला असल्याचं समोर आलं आहे
सितापूर, दि. 15 - देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. नेत्यांपासून ते अधिका-यांपर्यंत सर्वजण ध्वजवंदन करताना दिसत आहेत. तिरंग्याचा अपमान होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असताना, भाजपा खासदाराने मात्र उलटा झेंडा फडकावला असल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील धौरहरा येथील भाजपा खासदार रेखा वर्मा यांनी ध्वजवंदन करताना उलटा झेंडा फडकावला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये रेखा वर्मा उलटा तिरंगा फडकावत असून, फोटो काढून घेत असताना दिसत आहेत.
हे फोटो सितापूरमधील महोली येथी पिसावा ब्लॉकमधील आहेत. रेखा वर्मा यांच्याशी यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रसारमाध्यमांनी प्रयत्न केला असता त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही.
@narendramodi ye h aapje govt k M. P.(DHAURAHARA UP) Rekha verma ji... Indian flag ka apman krne me inhe jra bhi hichak nhi hui...shameful. pic.twitter.com/ilNVQXcHEP
— Abhishek Kr Mishra (@Abhishe80385696) August 15, 2017
भाजपा गेल्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये तिरंगा यात्रा काढत आहे. या यात्रांमध्ये भाजपा आमदार - खासदारांपासून ते केंद्रीय मंत्री सामील होताना दिसत आहेत. रेखा वर्मा यांनीही सितापूरमधील महोली परिसरात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र तिरंगा उलटा फडकावल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो व्हायरल होत असून, लोकांनी खासदार असूनही तिरंगा सरळ पकडला आहे की उलटा हे लक्षात न आल्याने रोष व्यक्त केला आहे.
कायद्यानुसार एखादी व्यक्ती राष्ट्रचिन्ह तसंच राष्ट्रध्वदाचा तोंडी किंवा लिखीत अपमान करत असेल तर त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि दंड दोन्ही होऊ शकतो. यामध्ये काही तांत्रिक बाबीही आहेत. खासदार रेखा वर्मा यांच्यावर कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते का हे पहावं लागेल.
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'न्यू इंडिया'चा नारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांना संबोधित केले. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.