Lakhimpur Violence: भाजप खासदार वरुण गांधींनी आपल्या ट्विटर बायोमधून हटवले पक्षाचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 02:29 PM2021-10-04T14:29:58+5:302021-10-04T14:35:20+5:30
UP Lakhimpur Violence: खासदार वरुण गांधींनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसह पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती.
पीलीभीत:उत्तर प्रदेशातील पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमधून 'भाजप' हा शब्द काढून टाकला आहे. वरुण गांधी यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसह पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचा दर ₹ 350 / क्विंटलवरुन 400 रुपये करण्याची मागणी केली होती.
भाजप खासदार वरुण गांधी यांनी सीएम योगींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लखीमपूर खीरीमध्ये विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्घृणपणे चिरडल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या घटनेच्या एक दिवस आधी देशाने अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली होती. लखीमपूर खीरीमध्ये दुसऱ्याच दिवशी आमच्या अन्नदात्यांना ठार मारल्याच्या घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशोभनीय आहे. आंदोलक शेतकरी बांधव आपलेच नागरिक आहेत. शेतकरी बांधव काही समस्यांमुळे त्रस्त असतील आणि त्यांच्या लोकशाही हक्कांखाली निषेध करत असतील तर आपण त्यांच्याशी मोठ्या संयमाने वागले पाहिजे.
त्यांनी पत्रात पुढे लिहिले की, आपण आमच्या शेतकऱ्यांशी केवळ आणि केवळ गांधीवादी आणि लोकशाही मार्गाने कायद्याच्या कक्षेत संवेदनशीलतेने वागले पाहिजे. या घटनेत शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करताना मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. मी तुम्हाला विनंती करतो की या घटनेशी संबंधित सर्व संशयितांची त्वरित ओळख पटवा आणि आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करा. याशिवाय, पीडितांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई देखील देण्यात यावी आणि भविष्यात शेतकऱ्यांवर असा अन्याय किंवा इतर अत्याचार होणार नाहीत याची खात्री करावी. मला आशा आहे की या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तुम्ही माझ्या विनंतीवर त्वरित कारवाई कराल.
लखीमपूर खीरीमध्ये काय झालं?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह नऊ जण ठार झाले. ही घटना तिकोनिया-बनबीरपूर रस्त्यावर घडली. उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या दोन वाहनांनी आंदोलकांना कथितरीत्या धडक दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दोन्ही वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत चार शेतकरी आणि वाहनांवरील इतर चार लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि खेरीचे खासदार अजय कुमार मिश्रा यांचे मूळ गाव असलेल्या मण्य यांच्या बनबीरपूरच्या दौऱ्याला शेतकरी विरोध करत होते.