दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलणाऱ्या भाजपा खासदाराला शौर्य पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 10:06 AM2018-02-10T10:06:44+5:302018-02-10T10:07:22+5:30
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार होते.
नवी दिल्ली: दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामांतर करणारे खासदार महेश गिरी यांना शुक्रवारी शिवाजी पुरस्काराने गौरवण्यात आले. पूर्व दिल्ली मतदारसंघाचे खासदार असलेल्या गिरी यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून त्याला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव दिले होते. त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत गिरी यांना शिवाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार होते. मात्र, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत.
पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात गिरी यांनी म्हटले की, आजच्या काळाचा संदर्भ लावायचा झाल्यास औरंगजेब हा एक दहशतवादी होता. मी प्रत्येकवेळी औरंगजेब रोडवरून जायचो तेव्हा माझ्या मनाला खूप यातना होत असत. औरंगजेबाच्या राजवटीत भारतीय संस्कृतीचा विनाश करण्यात आला. अनेक निरपराध लोकांची हत्या करण्यात आली. तरीदेखील दिल्लीतील रस्त्याला अशा राज्यकर्त्याचे नाव का दिले?, असा प्रश्न मला पडायचा. त्यामुळे मी या रस्त्याचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे सर्व सुरू असताना मला अनेक धमक्याही देण्यात आल्याचे गिरी यांनी सांगितले. गिरी यांच्या पाठपुराव्यानंतर नवी दिल्ली महानगरपालिकेने 28 ऑगस्ट 2015 रोजी या रस्त्याचे नाव बदलले होते.