भाजपा खासदाराचा तीन कोटींचा ठुमका
By admin | Published: April 19, 2015 02:17 AM2015-04-19T02:17:41+5:302015-04-19T02:17:41+5:30
हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस आणि त्यासोबत चक्क महिला खासदाराचा डान्स. हा प्रकार आहे, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातला. या वेळी केवळ ३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले गेले.
गुजरातच्या वेरावळमधील प्रकार : बेधुंद नाचत ३० सेकंदांत पाडला पैशांचा पाऊस
अहमदाबाद : हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस आणि त्यासोबत चक्क महिला खासदाराचा डान्स. हा प्रकार आहे, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातला. या वेळी केवळ ३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले गेले. टीव्हीवर संपूर्ण देशातील जनतेने नोटांचा पाऊस आणि त्यानंतर साचलेला नोटांचा ढीग पाहिला. गुजरातमध्ये वेरावळ इथल्या एका भागवतकथा कार्यक्रमात हा प्रकार सुरू होता.
पैशांचा असा पाऊस यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवतेय का, नाही ना? पण ते येथे सत्यात उतरले होते. गुजरातमध्ये पैसे उधळले जाताहेत व या नोटांच्या पावसात बेभान होऊन नाचत आहेत, चक्क भाजपाच्या खासदारबाई. शेकडो लोकांसमोर थिरकणाऱ्या या पूनमबेन गुजरातमधल्या जामनगरच्या खासदार आहेत. अहीर समाजाच्या कार्यक्रमाला जणू रंगरसिया ज्वर चढला. चाळिशीतल्या खा. पूनमबेन बेधुंद नाचत होत्या. त्यांच्या तालावर एका बुजुर्ग स्थानिक नेत्यानेही ठुमका धरला व शेकडो लोकांनी नोटा उधळल्या. लोकही एवढे बेधुंद होऊन नाचत होते की काही तर एकमेकांच्या खांद्यावर बसून नोटांचा वर्षाव करीत होते.
देणगीदाखल पैसे उधळले
सौराष्ट्रची ही शंभर वर्षांची परंपरा (लोक दायरो) आहे. देणगीत मिळालेल्या पैशांचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला जातो. या कार्यक्रमात मी यापूर्वीही सहभागी होत आले आहे. या पैशाचा उपयोग मुलींसाठी वसतिगृह आणि गोशाळा बांधण्यासाठी केला जाईल. भाजपची खासदार म्हणून नव्हे, तर समाजकन्या म्हणून मी यात सहभागी झाले. भाविकांवर देणगीदाखल नोटांची ही उधळण करण्यात आली, अशी सारवासारव खा. पूनमबेन यांनी केली.
पूनमबेन यांच्या नृत्याविष्कारादरम्यान किमान ३ कोटी उधळले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंतप्रधानांनी साध्या राहणीचा खासदारांना कितीही सल्ला दिला तरी गुजरातमध्ये पालथ्या घड्यावर अशी स्थिती आहे.