भाजप खासदारांना मालदा रेल्वे स्थानकातच रोखले
By Admin | Published: January 11, 2016 09:40 AM2016-01-11T09:40:22+5:302016-01-11T11:29:11+5:30
मालदा जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती जाणून घेण्यासाठी भाजपने स्थापन केलेली त्रिसदस्यीय समिती सोमवारी सकाळी मालदा रेल्वे स्थानकात दाखल होताच पोलिसांनी रोखले.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ११ - मागच्या आठवडयात पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती जाणून घेण्यासाठी भाजपने स्थापन केलेली त्रिसदस्यीय समिती सोमवारी सकाळी मालदा रेल्वे स्थानकात दाखल होताच पोलिसांनी या समितीच्या सदस्यांना ताब्यात घेतले.
मागच्या आठवडयात तीन जानेवारी रोजी मालदाच्या कालियाचाक भागात कट्टरतावाद्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची माहिती जाणून घेण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तीन खासदारांची समिती बनवून त्यांना मालदा येथे पाठवले होते.
सोमवारी सकाळी सात वाजता ही त्रिसदस्यीय समिती मालदा रेल्वे स्थानकात दाखल होताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली असी तर तणाव वाढला असता, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसाांनी त्यांना रोखले असून मालदातील कालियाचाक भागाला भेट न देताच समितीचे सदस्य कोलकात्याला परतले आहेत.
कालियाचाकमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. आम्हाला मालदा रेल्वे स्थानकातच रोखले, पुढे जाऊ दिले नाही हे दुर्देव आहे असे या समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी सांगितले.